मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पनवेल ते सिंधुदुर्ग दरम्यान गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना १६ सप्टेंबरपासून वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २० सप्टेंबपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच पाच व सात दिवसांच्या गणपती विसर्जन तसेच प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी २३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशीदिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या बंदीतून अत्यावश्यक सेवेतील वाहने, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले असून याबाबतचा शासन आदेश काढण्यात आल्याचे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर? गोवा महामार्गाच्या मुंबई मार्गिकेकडे दुर्लक्ष

गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडय़ांच्या डब्यांत वाढ

मुंबई : मध्य रेल्वेने गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडय़ांच्या डब्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ६ रेल्वेगाडय़ामध्ये १६ डबे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११६५ एलटीटी – मंगळुरू एक्स्प्रेसला अतिरिक्त दोन शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण २० डब्यांची एक्स्प्रेस २२ डब्यांची होईल. तसेच गाडी क्रमांक ०११६६ मंगळुरू – एलटीटी एक्स्प्रेस २० डब्यांवरून २२ डब्यांची करण्यात आली आहे. या गाडीला दोन शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११६७ एलटीटी – कुडाळ एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ०११६८ कुडाळ – एलटीटी एक्स्प्रेसला २ शयनयान डबे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. गाडी क्रमांक ०११५५ दिवा – चिपळूण एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ०११५६ चिपळूण – दिवा एक्स्प्रेसला ४ सामान्य मेमू डबे जोडण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on heavy vehicles on mumbai goa highway in ganeshostav ysh
Show comments