मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या साहित्य, नाटक, चित्रपटांवर बंदी घालण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत एक समिती नेमली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. या बाबतचा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.

संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली जुनी पुस्तके, नाटके आणि चित्रपटांवर बंदी घालावी. ‘राजसंन्यास’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ आदी नाटके, तसेच चित्रपटांवर बंदी आणावी. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी २० नाटके, ४० पुस्तके आणि काही सिनेमे आहेत. ज्यात अधिक अपमानजनक सामग्री आहे. काही पुस्तके राज्याने छापून प्रकाशित केली आहेत. त्यामुळे भविष्यात पुस्तके छापणे, प्रकाशन आणि वितरणावर प्रतिबंध लावावेत. विकिपीडिया, यूट्युब आणि समाज माध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. त्याला उत्तर देताना पंकज भोयर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधने समिती नेमण्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. परंतु अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातली तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या नष्ट होतील. लेखकांच्या कल्पना स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कारण यामध्ये वसंत कानिटकर आणि राम गणेश गडकरी यांची ऐतिहासिक नाटके आहेत, त्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.