Mumbai मुंबईतल्या वांद्रे येथील भारत नगरमध्ये SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाण्याची कारवाई सुरु होण्यापूर्वीच त्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी JCB सह दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हे बांधकाम पाडण्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई इथे दाखल झाले असून एसआरएच्या तोडक कारवाईला त्यांचा विरोध आहे. घरांवर जेसीबी चालणार म्हणून सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासन आणि नागरिकांमध्ये राड्याची स्थिती निर्माण झाली आहे.
वरुण सरदेसाई काय म्हणाले?
अदाणी ग्रुप आणि सरकार मिळून हे सगळं करत आहेत. मी एसआरएच्या कार्यालयात दिवसभर बसलो होतो. लोकांचा किती रोष आहे हे तुम्ही बघू शकता. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी वारंवार सांगितलं होतं की अदाणी ग्रुप फक्त पैसे फेकण्याचं काम करतो. मात्र हा समूह लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो” असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधला-सरदेसाई
मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फक्त आश्वासन मिळाली. दीडशे-दोनशे पोलीस घेऊन येऊ नका. विकास करण्याआधी लोकांना विचारा. त्यांना विश्वासात घ्या. तोडणाऱ्या १८० घरांसह कुठलाही करार झालेला नाही. तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत” असं वरुण सरदेसाई म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
“आम्ही या ठिकाणी जी काही दादागिरी सुरु झाली आहे ती आम्ही खपवून घेणार नाही. एसआरएचे लोक निर्ल्लजपणे अदाणीची साथ देत होती. कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. एसआरएचे अधिकारी काय करत आहेत? आम्ही एसआरएच्या घरांवर मोर्चा काढला तर काय होईल? हा निरोप त्यांना द्यायला आलो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करुन एसआरएचे अधिकारी हे दलाली करत आहेत. अदाणी असो किंवा कुणीही असो रितसर काही करत असतील तर आक्षेप नाही. पण अनधिकृतपणे कुणी काही करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरुन जनतेची ताकद दाखवू. हेच चित्र उद्या धारावीत दिसू शकतं. तुमच्या-आमच्या घरांवरही अशी कारवाई होऊ शकते. यांना फक्त मुंबई गिळायची आहे.” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
एसआरएचं सदर घटनेबाबत स्पष्टीकरण काय?
भारतनगर झोपडपट्टी वांद्रे पूर्व येथे ऐकून ३२०६ झोपड्या होत्या, त्यापैकी २७०० झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या झोपड्या रिकाम्या केल्या आहेत, त्यापैकी १३२० जणांचे पुनर्वसन ही करण्यात आलं आहे. सुमारे १४०० झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचे भाडे देण्यात येत आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी सदरची जागा हवी आहे, म्हणून १७८ झोपडपट्टी धारकांना निष्कासनाची नोटीस देण्यात आली आहे. या सर्व १७८ झोपड्यांसाठी, विकासकाकडून ३ वर्षांचे भाडे भरून घेण्यात आले आहे, जे झोपडपट्टी धारक स्वयंखुशीने झोपडी रिकामी करतील आणि करारनामा करतील त्यांचीच झोपडी ताब्यात घेण्यात येईल. आम्ही एसआरए म्हणून पूर्णपणे नियमाच्या आधारेच काम करतो, कोणाच्या वैयक्तिक फायदा अथवा नुकसान बघून नाही. आज सर्वोच्च न्यालयात हे प्रकरण सुनावणीसाठी येणार असल्याचे स्थानिकांकडून समजले, यापुढची कार्यवाही ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहूनच केली जाईल. असं स्पष्टीकरण उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोप्रुप्रा-एसआरए) यांनी दिलं आहे.