मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्याकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे नारायण राणे यांचे राजकीय भवितव्य आणखी अडचणीत आले आहे. नारायण राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला विरोधकांनी दिला आहे. बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा १९ हजार मतांनी पराभव केला.
शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कॉंग्रेसने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक सुरुवातीपासून चुरशीची झाली. शिवसेना पक्ष आणि नारायण राणे समर्थक या दोघांनीही विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नारायण राणे यांना तर भाजप, रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ‘मातोश्री’च्या अंगणात ही निवडणूक होत असल्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर शिवसैनिकांनी नारायण राणे यांना चारीमुंड्या चीत करून आपला गढ कायम राखला. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकणातील कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्याच उमेदवाराने नारायण राणे यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे.
एमआयएम या पक्षालाही वांद्रे पूर्व मतदारसंघात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. एमआयएमचे रेहबर खान मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासून तिसऱय़ा स्थानावर फेकले गेले. वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत केवळ ३८ टक्के मतदान झाले होते.
अंतिम निकाल
तृप्ती सावंत (शिवसेना) – ५२७११
नारायण राणे (कॉंग्रेस) -३३७०३
रेहबर खान (एमआयएम) – १५०५०
वांद्र्यामध्ये नारायण राणेंचा लाजीरवाणा पराभव, तृप्ती सावंत विजयी
मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्याकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
आणखी वाचा
First published on: 15-04-2015 at 08:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra east by poll election result trupti sawant won by 19 thousand votes