मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघात आज (शनिवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी सकाळपासून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा धडाका लावला आहे. वाकोला पोलिसांनी आमदार नितेश राणे आणि खेरवाडी पोलिसांनी माजी खासदार निलेश राणे यांना अटक करून काही काळाने त्यांची सुटका केली. त्यानंतर शिवेसना खासदार विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्यावरही आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत निर्मलनगर पोलिसांची कारवाई केली.
पोलिसांची कृती दडपशाहीची असून आपला पराभव होईल या भितीने शिवसेना सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केला आहे. यापुढे शिवसेनेच्या मतदारसंघातल्या बाहेरच्या मंत्र्यांच्या गाड्या फिरताना दिसल्या तर त्या आपण अडवू, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.
वांद्रे (पूर्व) मतदारसंघात नितेश राणे आपल्या सुरक्षारक्षकासह फिरत होते. तर निलेश राणे मतदान केंद्राजवळ कार्यकर्त्यांसह फिरत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदान सुरू असताना अशा प्रकारे फिरता येणार नाही, असा युक्तिवाद पोलिसांनी करून नितेश आणि निलेश राणेंना ताब्यात घेतलं होतं.
शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून वांद्रे येथे माजी उद्योगमंत्री नारायण राणे रिंगणात असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या पोटनिवडणुकांकडे लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा