वांद्रे कुर्ला संकुलात असलेल्या सिटी बँकेच्या नवीन कार्यालयाला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. मात्र केवळ दोन तासांत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमुळे अडकलेल्या दहा मजुरांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या नव्या कार्यालयाचा वापर सुरू झालेला नसल्यामुळे मोठी जिवितहानी टळल्याचे सांगण्यात आले. वांद्रे कुर्ला संकुलातील एफआयएफसी या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सिटी बँकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित मजले अद्याप रिक्त आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली आणि अचानक आगीने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. या आगीत फर्निचर,  सव्‍‌र्हर जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ही आग विझवण्यासाठी नऊ फायर इंजिन, पाच वॉटर टँकर आणि एक स्नॉर्केलचा वापर कऱ्ण्यात आला. या आगीत जिवितहानी झाली नसली तरी दहा लाखांपेक्षा अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीतील फायर यंत्रणा सुरळीत कार्यरत असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यास मदत झाल्याचे मुख्य अग्निशमन आधिकारी सुहास जोशी यांनी सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा