मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्याची शिवसेनेची मागणी
वांद्रे येथील म्हाडाच्या भूखंडाचा विकास करताना बिल्डरला अतिरिक्त लाभ कशासाठी, असा सवाल करीत म्हाडानेच विकास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली आहे.
वांद्रे येथील तीन हेक्टर जागेवरील संक्रमण शिबिरातील रहिवाशांना व झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी २००४ मध्ये निविदा काढण्यात आली होती. पण आतापर्यंत फारसे काहीच झाले नसल्याने आणि हा भूखंड एमएमआरडीए क्षेत्रातून काढून महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने बिल्डरचा फायदा होणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढी संपल्या असून त्यावेळच्या अटीशर्तीमध्येही व परिस्थितीत बदल झाला आहे. गेल्या १२ वर्षांत जागेचे दरही कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांकरिता घरे बांधण्यासाठी म्हाडानेच तो भूखंड विकसित करण्याऐवजी महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन बिल्डरमार्फत काम करण्याचे प्रयत्न होत आहेत.
भाजप खासदार पूनम महाजन, आमदार आशीष शेलार यांनीही म्हाडामार्फत भूखंड विकसित करण्याबाबत अनुकूल भूमिका घेतली असून शिवसेना आमदार परब यांनीही तीच मागणी केली आहे.