मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे तीन अतिरिक्त देखभाल-दुरुस्ती करणारी मार्गिका (पिट लाइन) बांधण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात आवश्यकतेनुसार या पिट मार्गिकेचा वापर वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी होऊ शकतो. तसेच सध्या दररोज ९ रेल्वेगाड्यांची तपासणी होत असून, पिट मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची क्षमता वाढेल.
सध्या वांद्रे टर्मिनस येथे दररोज सरासरी ४६ रेल्वेगाड्यांची ये-जा होते. त्यापैकी नऊ रेल्वेगाड्यांची तीन पिट मार्गिकेवर तपासणी केली जाते. तर, फेब्रुवारी २०२५, मार्च २०२५ आणि मे २०२५ मध्ये प्रत्येकी एक अशा आणखी तीन पिट मार्गिका सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांची देखभाल – दुरुस्तीची क्षमता वाढेल. नवीन पिट मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता प्रतिदिन ३२ रेल्वेगाड्या इतकी होईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा ; जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले, निवासी डॉक्टर मानसिक तणावाखाली
वांद्रे टर्मिनसवरील नवीन पिट मार्गिकेमुळे टर्मिनसची कार्यक्षमता आणि रेल्वेगाड्या उभ्या करण्याची क्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे. या पिट मार्गिका वंदे भारत आणि इतर गाड्यांची तपासणी आणि देखभाल करण्यासाठी सुसज्ज असतील. सध्या, मुंबई सेंट्रल विभागातील अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसची देखभाल मुंबई सेंट्रल येथे होते, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.