मार्चच्या पहिल्या आठवडय़ात कामास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कारवाईचा बडगा उगारताच कंत्राटदाराने वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाच्या कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात या कामाला सुरुवात होणार आहे. वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम ऑगस्टपासून बंद आहे. सात हजार कोटी रुपये खर्चाच्या १७.१७ किमी लांबीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम ‘वी बिल्ड, अस्टाल्डी’ कंपनीला देण्यात आले होते. ‘वी बिल्ड’ कंपनीसह यात ‘रिलायन्स इन्फ्रा’ कंपनीची भागीदारी होती. प्रकल्पाचे कार्यादेश मिळल्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र कास्टिंग यार्डच्या जागेचा प्रश्न आणि त्यानंतर करोना यामुळे कामावर परिणाम झाला. यामुळे कंत्राटदाराला १५ महिन्यांची मुदतवाढ देण्याची वेळ एमएसआरडीसीवर ओढवली. या काळात काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. मात्र, कास्टिंग यार्डचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर, तसेच करोनासंदर्भातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर कामाला वेग मिळणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने कामाला वेग देणे दूर, कामच बंद करून टाकले.

 सागरी सेतूचे काम मागील सात, आठ महिन्यांपासून बंद होते. या दोन वर्षांच्या काळात कंत्राटदाराने केवळ दोन टक्केच काम पूर्ण केले. काम सुरू करण्याबाबत कंत्राटदाराला वारंवार नोटीस देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही काम सुरू होत नसल्याने अखेर एमएसआरडीसीने दंडात्मक कारवाई करून कंत्राट रद्द करण्याचे संकेत दिले. सप्टेंबर २०२१ पासून दिवसाला साडेतीन कोटी रुपये दंड आकारण्यात आला. हा दंड अनामत रकमेतून अजूनही वसूल केला जात असून पहिल्या टप्प्यात कंत्राटदाराला देण्यात आलेले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दंड वसूल केला जाणार आहे. या दंडात्मक कारवाईनंतर कंत्राटदाराने आता नव्या भागीदाराबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ भागीदार रिलायन्स इन्फ्रा आर्थिक अडचणीत असल्याने सागरी सेतूचे काम रखडले होते, असे कारण पुढे करीत कंत्राटदाराने ‘अपको’ कंपनीशी भागीदारी केली आहे. ‘वी बिल्ड’ला आपले शेअर देत रिलायन्स इन्फ्रा कंपनीने प्रकल्पातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ‘वी बिल्ड’ने ‘अपको’शी भागीदारी केली असून या नव्या कंत्राटदारासह काम करण्याची परवागी मागितली होती. करारातील तरतुदीनुसार यास परवानगी देण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘समृद्धी’च्या कामातील कंत्राटदार कंपनीशी भागीदारी

‘वी बिल्ड’ने भागीदारी केलेली ‘अपको’ कंपनी लखनऊ, उत्तर प्रदेशची आहे. समृद्धी महामार्गाच्या काही टप्प्याचे काम ही कंपनी करीत असून कंपनीचे काम समाधानकारक आहे. त्यामुळे आता ‘वी बिल्ड’ आणि ‘अपको’ मिळून सागरी सेतूच्या कामाला वेग देतील, असा विश्वास एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. २०२६ ला काम पूर्ण  करारानुसार २०२५ मध्ये सागरी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. पण कामास दोन वर्षांचा विलंब झाला आहे. असे असले तरी आता वेगाने काम पूर्ण करण्यात येईल आणि २०२६ पर्यंत सागरी सेतू पूर्ण होईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra versova sea bridge work begins first week march ysh
Show comments