एमएसआरडीसीचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वरळी-वांद्रे सागरी सेतूचा वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या माध्यमातून विस्तार करीत आहे. या सेतूचे काम सध्या वेगात सुरू असून हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यास जुहूच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर अतिजलद येता येणार आहे. आता एमएसआरडीसीने या सागरी सेतूच्या दोन आंतरबदल मार्गिकांमध्ये (इंटरचेंज) बदल केला आहे. जुहू आणि वर्सोवा या दोन आंतरबदल मार्गिकांच्या लांबीत दीड ते दोन किमीने वाढ करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहचणे सोपे व्हावे आणि जुहू परिसरात वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तर या बदलाच्या अनुषंगाने प्रकल्पाच्या खर्चात अंदाजे ३ हजार कोटी रुपयांनी वाढ अपेक्षित आहे.

आतापर्यंत २७ टक्के काम पूर्ण

एमएसआरडीसी १७.१७ किमी लांबीचा आणि अंदाजे सात हजार कोटी रुपये खर्चाचा वांद्रे – वर्सोवा सागरी सेतू बांधत आहे. वरळी – वांद्रे सागरी सेतूचा हा विस्तार आहे. या प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र काम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच करोना संकट आले आणि काम बंद झाले. तर करोना निर्बंध उठविण्यात आल्यानंतरही कंत्राटदाराने काम बंदच ठेवले. २०१९ ते २०२१ या कालावधीत प्रकल्पाचे केवळ अडीच टक्केच काम झाले होते.

अखेर एमएसआरडीसीने याची गंभीर दखल घेतली आणि कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई केली. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून सप्टेंबर २०२१ पासून प्रतिदिन साडेतीन कोटी कुरे दंडही केला. अखेर कंत्राट रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर मात्र या कंपनीने जानेवारी २०२२ मध्ये रिलायन्स इन्फ्राशी असलेली भागिदारी संपुष्टात आणली आणि नवीन भागिदाराची निवड करून कामाला सुरुवात केली.

‘वी बिल्ड अस्टाल्डी’ या कंत्राटदाराने ‘अपको’ या नव्या भागिदाराच्या साथीने मे २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. आता कामाने गती घेतली आहे. त्यामुळेच आता या प्रकल्पाचे २७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करून हा सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

प्रकल्पात महत्त्वाचे बदल वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामाला वेग देण्यात आला असतानाच आता प्रकल्पातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जुहूमधील दोन आंतरबदल मार्गाच्या लांबीत वाढ करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जुहू आंतरबदल मार्गाची लांबी रिलीफ रोडपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर वर्सोवा आंतरबदल मार्गिकेची लांबी जुहू सर्कलच्या दिशेने वाढविण्यात आली आहे.

साधारणत दीड ते दोन किमीने ही लांबी वाढविण्यात आली आहे. या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चात अंदाजे तीन हजार कोटी रुपये वाढ होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सागरी किनारा मार्गाने वरळी – वांद्रे सागरी सेतूला आणि पुढे वांद्रे – वर्सोवा सेतुवरून जाणाऱ्या वाहनांना जुहूवरून पुढे पश्चिम द्रुतगती मार्गावर अतिजलद जाता यावे आणि जुहू परिसरात वाहनांची गर्दी वा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.