मुंबई…वांद्रे-वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये सुरुवात झाली असून पाच वर्षात या प्रकल्पाचे केवळ २३ टक्के काम पूर्ण झाले आहे. आव्हानात्मक काम आणि २०२० ते २०२२ दरम्यान काही कारणाने काम पूर्णत बंद असल्याने त्याचा फटका या प्रकल्पाला बसला आहे. त्यामुळेच हा प्रकल्प २०२५ ऐवजी आता मे २०२८ मध्ये पूर्ण होणार आहे.
हेही वाचा >>> शिवाजी नगर येथे बेस्ट बसचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास अतिवेगवान करण्यासाठी सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीकडून वांद्रे ते वरळी सागरी सेतू बांधण्यात आला असून हा सेतू गेल्या काही वर्षांपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या वांद्रे-वरळी सागरी सेतूचा वांद्रे ते वर्सोवा असा विस्तार करण्याचा निर्णय घेत एमएसआरडीसीने वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू बांधण्याच्या कामास सुरुवात केली. २०१९मध्ये या १७.१७ किमीच्या सागरी सेतूच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र २०१९ ते २०२२ मध्ये या प्रकल्पाचे काम केवळ अडीच टक्के झाले. टाळेबंदी आणि कंत्राटदाराच्या भागीदारीमध्ये आलेल्या अडचणींमुळे २०२० ते २०२२ दरम्यान या प्रकल्पाचे काम पूर्णत ठप्प होते. याप्रकरणी कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती.
हेही वाचा >>> अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची भीती घालून ३७ लाखांची खंडणी, तीन महिलांविरोधात गुन्हा
शेवटी मुख्य कंत्राटदाराने या सर्व अडचणी दूर करत २०२२ पासून कामाला सुरुवात केली. दरम्यान प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदलही एमएसआरडीसीला करावा लागला. जुहू कनेक्टरला मच्छिमारांचा विरोध असल्याने हा बदल करावा लागला. २०२२ पासून खर्या अर्थाने या सागरी सेतूच्या कामाला सुरुवात झाली. तर आता कामाने वेग घेतला असून आतापर्यंत या सागरी सेतूचे २३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत २३ टक्के काम पूर्ण झाले असले तरी सुरुवातीला अनेक अडचणी आल्याने काम ठप्प होते. पण आता मात्र काम वेगात सुरु आहे. तसेच समुद्रात काम करणे अत्यंत आव्हानात्मक असून अनेक प्रकारच्या परवानग्या सातत्याने घ्याव्या लागत आहेत. परिणामी कामास काहीसा वेळ लागत असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. तर हे काम मे २०२८ मध्ये पूर्ण करत वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाहनचालक-प्रवाशांना सागरी मार्गाद्वारे आणि सागरी सेतूद्वारे नरिमन पाॅईंट ते वर्सोवा असा थेट प्रवास करता येणार आहे. मात्र त्यासाठी मुंबईकरांना मे २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.