मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. सोमवारी २७ जानेवारीपासून या पुलावरून दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावरून ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पणही यावेळी होणार आहे. मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचा थोडा थोडा भाग आतापर्यंत खुला करण्यात आला होता. मात्र येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सागरी किनारा मार्ग वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे.

लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर, तर पोहोच रस्ता १२८ मीटरचा आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २४०० मेट्रिक टन वजनाची तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन करण्यात आली होती. या तुळईची लांबी १४३ मीटर, तर रुंदी २७ मीटर आणि उंची ३१ मीटर इतकी आहे.

मे. टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटस् करणार दुभाजक सुशोभीकरण

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये प्रियदर्शनी पार्कपासून वरळीपर्यंत जवळपास ४.३५ किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे ४.८३ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील दुभाजकांचे मे. टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटस््कडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) हे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाविषयी

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाड काँक्रिटचे अस्तर आहे. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायुवीजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदे आहेत. तसेच या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.

Story img Loader