मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेत बंगळुरू येथील आर. के. शिशिर हा देशात पहिला आला, तर दिल्लीची तनिष्का काब्रा ही देशात मुलींमध्ये पहिली आली. या परीक्षेतून जवळपास ४० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी जेईई मुख्य आणि त्यानंतर अ‍ॅडव्हान्स या परीक्षांचे टप्पे विद्यार्थ्यांना पार करावे लागतात. या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. देशात अव्वल ठरलेल्या शिशिरला ३६० पैकी ३१४ गुण मिळाले, तर मुलींमध्ये पहिल्या आलेल्या तनिष्काला २७७ गुण मिळाले आहेत. मुंबईचा ओजस महेश्वरी हा अपंग विद्यार्थ्यांमध्ये अव्वल ठरला आहे.

  यंदा एक लाख ५५ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ४० हजार ७१२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील सहा हजार ५१६ मुली आहेत. यंदा देशभरातील २३ आयआयटीमध्ये ३६६ जागा वाढविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यामुळे या सर्व आयआयटीची मिळून १६ हजार ५९८ प्रवेश क्षमता आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या संगणक विज्ञान शाखेसाठी १८९१ जागा आहेत. देशभरात पहिल्या पाचही स्थानी असलेल्या विद्यार्थ्यांचे प्राधान्य संगणकशास्त्राच्या अभ्यासाला आहे.

यंदा परीक्षेला बसलेल्या २९६ परदेशी विद्यार्थ्यांपैकी १४५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास विभागातून पहिल्या शंभरमध्ये प्रत्येकी २९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर पहिल्या ५००मध्ये सर्वाधिक १३३ विद्यार्थी हे आयआयटी दिल्ली विभागातील आहेत. यंदा या परीक्षेचे आयोजन आयआयटी मुंबईने केले होते.