लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बँकॉक गांजा तस्करीचे केंद्र बनत असून सीमशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच केलेल्या कारवाईत ५६ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत पाच आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपॉनिक गांजाची किंमत ५६ कोटी रुपये आहे. बँकॉकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपॉनिक गांजाची तस्करी करण्यात येत असून गेल्या महिन्याभरात मुंबई विमानतळावरून ७० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

बँकॉकहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार पाच संशयीत प्रवासी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले. त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. याचदरम्यान पाच संशयीत प्रवाशांना अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या बँकेत ५६ किलो २६० ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा हायड्रोपॉनिक गांजाचा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. आरोपीनी हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा लपवला होता.

आरोपींनी त्यांच्या बॅगेमध्ये विशिष्ट कप्पा तयार केला होता. त्यात गांजा लपवण्यात आला होता. पाचही प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर एका हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले होते. तेथे एक व्यक्ती संपर्क साधून त्यांच्याकडून गांजा घेणार होता. आरोपींना बँकाँक ते मुंबई प्रवासासाठी विमानाचे तिकिट आणि काही रक्कम कमिशन देण्याचे ठरले होते. पण त्यापूर्वीच त्यांना अटक झाली. त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉकमार्ग मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे दिसून आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा सुरू असते. त्यामुळे बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे. गेल्या महिन्याभरातून बँकॉकमधून आलेला ७० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.