मुंबईत येणारे बांगलादेशी हे प्रामुख्याने दहिसरच्या पुढे पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या वसाहतीत राहत असल्याचेही आढळून आले आहे. यापैकी काही बांगलादेशींकडे भारतीय पासपोर्टही असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा पासपोर्ट बनावट कागदपत्रे सादर करून तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तब्बल दीड ते दोन लाख बांगलादेशींचे या परिसरात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. त्याविरोधातही ठाणे पोलिसांमार्फत कारवाई सुरू असली तरी ती आता थंडावल्याचा आरोप केला जात आहे.

मुंबईत बांगलादेशींचा वावर सुरूच असून मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या कारवाईत ४८ बांगलादेशी कामगार जेरबंद करण्यात आले. बांधकामाच्या ठिकाणी प्रामुख्याने बांगलादेशी मजुरांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. मुंबईत ठिकठिकाणी असे बांगलादेशी कामगार खोटय़ा ओळखपत्रांच्या आधारे कार्यरत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
वडाळा येथे सुरू असलेल्या मोनोरेलच्या बांधकामासाठी बांगलादेशी मजूर काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने घटनास्थळी धाव घेतली आणि ४८ बांगलादेशी मजुरांना ताब्यात घेतले. त्यांना कामावर घेणाऱ्या चार कंत्राटदारांनाही पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने घुसखोरी करणाऱ्या ११५१ बांगलादेशी मुजरांना अटक केली असून त्यापैकी २५१ जणांना बांगलादेशला पाठविण्यात आले. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला बांगलादेशी मजूर वडाळा येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी वडाळा येथे सुरू असलेल्या मोनोरेल उभारणीच्या ठिकाणी छापा घालून सुमारे दोन हजार दोनशे कामगारांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांना ४८ कामगार बांगलादेशी असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद मडवर, लल्लन कुलतीराक साब, धनंजय पारतो, देवजित सुई अशा चार कंत्राटदारांना अटक केली आहे. या सर्वाना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्वच कामगारांची आता विशेष शाखेमार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत आढळणाऱ्या बांगलादेशी कामगारांना ताब्यात घेऊन त्यांना मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त संजय शिंत्रे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader