मुंबई : भारतात बेकायदेशिररित्या पारपत्र तयार करून कुवेतमध्ये ११ वर्षे नोकरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. पलासकुमार बिस्वास (३३) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून तो २० वर्षांपूर्वी बांगलादेशातून बेकायदेशिररित्या भारतात आला होता. उत्तर प्रदेशातून त्याने पारपत्र तयार करून घेतले आणि तो नोकरीसाठी कतारला गेला होता.
पलासकुमार हा इमिग्रेशन तपासणीसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तो कतारमधील दोहा येथून मुंबईत आला होता. त्याच्या पारपत्राची पाहणी करताना तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय इमिग्रेशन अधिकार्यांना आला. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्याने एका दलालाच्या मदतीने २००४ मध्ये बांगलादेशातून भारतात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात वास्तव्यास असताना त्याने बनावट पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्राच्या मदतीने त्याने लखनऊ येथील पारपत्र कार्यालयातून भारतीय पारपत्र मिळविले होते.
करातमध्येही पारपत्राचे नूतनीकरण
आरोपी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी कतारमधील दोहा येथे नोकरीसाठी गेला होता. मुदत संपलेल्या पारपत्राचे त्याने दोहा येथे नूतनीकरण केले होते. जवळपास ११ वर्ष तेथे काम केल्यानंतर तो सोमवार, २४ जून रोजी रात्री उशिरा कतार येथून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बोलण्याच्या लहेजावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय आला. त्यानंतर इमिग्रेशन अधिकार्यांनी तात्काळ त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशीत त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी सहार पोलिसांनी पलासकुमारविरुद्ध ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवीसह १२ पारपत्र अधिनियिम सहकलम १४ अ, १४ ब विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर आरोपीला तात्काळ न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. बांगलादेशमधून भारतात आल्यानंतर त्याला बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळविण्यास मदत करणार्या दलालाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी दलालाने त्याच्यासह आणखी बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचा संशया व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत.