मुंबई: पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तृतीयपंथी बनवून वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना शिवाजी नगर पोलिसांनी गोवंडी परिसरातून अटक केली. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे बांगलादेशी संपूर्ण मुंबईत तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कारवाई होऊ नये म्हणून बनले तृतीयपंथी

अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सध्या मुंबई पोलीस कारवाई करीत आहेत. गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. येथील रफिक नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक तृतीयपंथी बनून राहत असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सापळा रचून आठ जणांना ताब्यात घेतले. तपासात ते सर्वजण बांगलादेशी असल्याचे उघड झाले. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईतून वाचण्यासाठी तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे या बांगलादेशी नागरिकांनी चौकशीत पोलिसांना सांगितले.

आठ जण अटकेत

बैसाखी खान (२४), रिदोय मिया पाखी (२५), मारूफ इकबाल ढाली (१८), शांताकांत ओहीत खान (२०) बर्षा कोबीर खान (२२), अफजल हुसेन (२२), मिझानुर कोलील (२१) आणि शहादत आमिर खान (२०) अशी या आरोपींची नावे असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

चेंबूरमध्ये नऊ जणांना अटक

चेंबूरच्या माहुल गाव परिसरातील म्हाडा वसाहतीत अनधिकृत्या वास्तव्य करणाऱ्या नऊ जणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. यामध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. हे आरोपी गेल्या वर्षभरापासून येथे राहत होते.