मुंबईः घाटकोपर येथून एका संशयित बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. तो गेल्या सात वर्षांपासून नवी मुंबईतील घणसोली येथे बेकायदेशिररित्या राहत होता. त्यासाठी त्याला एका व्यक्तीने मदत केल्याचे चौकशीतून समोर आले.
हेही वाचा – मुंबई : दुचाकीवर धोकादायक साहसी कृत्ये करणाऱ्याला अटक
घाटकोपर येथील भटवाडी परिसरात एक संशयीत बांग्लादेशी नागरिक येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाला (एटीसी) मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचला होता. रात्री साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती तेथे आली. खबऱ्याने तीच व्यक्ती बांग्लादेशी नागरिक असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता व्यक्तीचे नाव आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख (४०) असल्याचे कळले. तसेच तो घणसोली गाव येथे वास्तव्याला असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यानंतर बांग्लादेशातील जामरील येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या अंगझडतीत मोबाईल संचासह त्याने घणसोली येथे मोहम्मद शेख नावाने जन्माचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्याची पावती पोलिसांना सापडली. भारतात राहण्यासाठी त्याला घणसोलीतील महमूद शेख नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.