डेबिट कार्डवरील माहिती चोरून संबंधित व्यक्तीच्या खात्यामधून पैसे काढून घेण्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. अ‍ॅक्सिस बॅंकेच्या एकूण २९ खातेदारांचे तब्बल १३ लाख रुपये चोरट्यांनी या पद्धतीने लांबविले. या खातेदारांमध्ये १२ पेक्षा अधिक खातेदार हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात अ‍ॅक्सिस बॅंकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरळी परिसरातील बॅंकेच्या एटीएममध्ये डेबिट कार्डवरील माहिती चोरण्यासाठी चोरट्यांनी उपकरण बसवले होते. या उपकरणामुळे डेबिट कार्डवरील माहिती चोरण्यात आली. त्यानंतर ग्रीसमधून माहिती चोरलेल्या खात्यातून पैसे काढण्यात आले. दरम्यान, ज्यांच्या खात्यांमधून या पद्धतीने पैसे काढण्यात आले आहेत. त्यांना ते परत देण्यात येतील, असे आश्वासन बॅंकेने दिले आहे.

Story img Loader