मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवताना बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज, २१ तारखेपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला असून त्यामुळे ऐन निवडणूक काळात बँकांचा संप होण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा >>> जोगेश्वरी पूर्वमध्ये गुरु शिष्य लढाई होणार ? वायकरांच्या मतदार संघात एकेकाळचा कार्यकर्ता अनंत नर लढणार ?
आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या किमान १२ घटना घडल्याचा दावा ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (यूएफबीयू) केला आहे. याचा निषेध म्हणून १५ ते २२ ऑक्टोबर दरम्यान कर्मचारी नियमित वेळेपेक्षा अधिक कामकाज करणार नाहीत. २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान निषेध बिल्ले लावून काम केले जाईल. २५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आंदोलन व १४ नोव्हेंबर रोजी प्रमुख शहरांमध्ये कर्मचारी मेणबत्ती पदयात्रा काढण्यात येईल. १५ नोव्हेंबर सर्व प्रमुख शहरांत आंदोलने आणि १६ नोव्हेंबर रोजी संप करण्यात येणार असल्याचे ‘यूएफबीयू’चे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
संघटनेचे म्हणणे काय?
‘लाडकी बहीण’ योजनेची मासिक रक्कम खात्यांमध्ये जमा होऊ लागल्यानंतर लघुसंदेश, एटीएम कार्ड यांचे सेवा शुल्क आपोआप कापले जात आहे. त्यामुळे खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये मोठे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. सरकारकडून नियोजन आणि संवादाचा अभाव असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून स्थानिक नेतेही गैरवर्तन, शिवीगाळ, मारहाण, धमक्या देणे असे प्रकार करीत असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात १२ गुन्हे नोंदवले असले तरी साधी कलमे लावल्यामुळे आरोपींना लगेच जामीन मिळत असल्याचे तुळजापुर म्हणाले