मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ९७५ कोटी रुपयाच्या बँक फसवणूकीप्रकरणी मंधाना इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम छगनलाल मंधाना यांना अटक केली. याप्रकरणी ईडीने नुकतीच मुंबईतील १२ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात पाच कोटी रुपयांचे शेअर्स, सुरक्षा ठेवी, बँक खाती आणि लॉकर्स गोठवण्यात आले. या कारवाईत वाहने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंधाना इंडस्ट्रीज, पुरुषोत्तम मंधाना, मनीष मंधाना, बिहारीलाल मंधाना आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्त्वाखाली बँक समुहाची ९७५ कोटी रुपयांची फसणूक केल्याची तक्रार होती. गुन्ह्यांतील रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अखेर गुरुवारी ईडीने पुरुषोत्तम मंधाना यांना अटक केली. पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना पीएमएलए न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर शनिवारी, तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक

हेही वाचा – गणेशोत्सव मंडळाना हवी मालमत्ता करमाफी; ५०० चौरस फुटांचा निर्णय मंडळाच्या कार्यालयांनादेखील लागू करावा, गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

याप्रकरणी २७ जून व ५ जुलैला ईडीने शोध मोहीम राबवली होती. शोध मोहिमेमुळे अनेक मालमत्तेच्या दस्तऐवजांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत. या कारवाईत १४० हून अधिक बँक खाती, ५ लॉकर्स आणि पाच कोटींच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. मर्सिडीज, लेक्सस सारख्या महागड्या गाड्या, तसेच रोलेक्स, हब्लॉटसह अनेक महागडी घड्याळे ईडीने जप्त केली होती. तीन कोटी रुपये किंमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank fraud of rs 975 crore ex chairman of mandhana industries purushottam mandhana arrested mumbai print news ssb