रेल्वेच्या घडाळ्याच्या काटय़ांवर धावणाऱ्या मुंबईकरांना आता ‘एटीएम’मधून पैसे काढण्याची सोय थेट फलाटावरच लाभणार आहे! आजवर काही महत्त्वाच्या स्थानकांबाहेरच ‘एटीएम’ केंद्रे होती आणि पैसे काढण्यासाठी स्थानकाबाहेर जावे लागत होते. आता फलाटांवरच ही सोय झाल्यास स्थानकातली गर्दी आणि जिन्यांची चढउतार यामुळे पैसे काढण्यासाठी होणारा द्राविडी प्राणायाम वाचणार आहे.
मध्य रेल्वेच्या ३८ स्थानकांवर विविध बँका ८३ एटीएम मशीन बसवणार आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना तसेच उपनगरी गाडीने प्रवास करणाऱ्यांना त्यामुळे प्रवासादरम्यान पैसे काढणे अधिक सुकर होणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.
रेल्वेने याआधी उभारलेल्या एटीएम मशीनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मध्य आणि हार्बर मार्गावरील ३८ स्थानकांवरील फलाटांवरच ही मशिन उभारली गेल्यास हा प्रतिसाद वाढणार आहे. या नव्या योजनेसाठी मध्य रेल्वेने अ‍ॅक्सिस, स्टेट बँक ऑफ इंडियासह नऊ बँकांशी पाच वर्षांचा करार केला आहे. या करारापोटी मध्य रेल्वेला ४५ कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळणार आहे.

स्थानके      एटीएम
कल्याण (पू)    ६
कल्याण (प)    ६
भायखळा        ५
कोपर             ४
मानखुर्द          ४
गोवंडी             ३
दादर               २
परळ              २
पनवेल           २
कुर्ला              १
घाटकोपर      १
कळवा           २

Story img Loader