लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ चे संचलन करणारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी अडचणीत आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एमएमओपीएलविरोधात ४१६.०८ कोटी रुपयांच्या वसूलीसाठी दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

एमएमओपीएल हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्राचा संयुक्त उपक्रम आहे. मुंबईतील पहिल्या मेट्रोच्या संचलनाची जबाबदारी २०१४ पासून एमएमओपीएलवर आहे. मेट्रो १ ची ७६ भागीदारी एमएमओपीएलकडे तर २६ टक्के भागीदारी एमएमआरडीएकडे आहे. दरम्यान मेट्रो १ च्या उभारणीसाठी २३५६ कोटी असा असलेला बांधकाम खर्च ४३२१ कोटींवर गेला. हा खर्च वसूल करण्यासाठी मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्याची विनंती करून न्यायालयात धाव घेतली होती. मात्र एमएमओपीएल काही दिलासा मिळाला नाही. त्यात मेट्रो १ तोट्यात आहे. त्यामुळे मेट्रो १ एमएमआरडीएने ताब्यात घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ही विनंती मान्य करून मेट्रो १ ताब्यात घेण्यासाठी २०२१ मध्ये सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र ही प्रक्रिया म्हणावी तशी पुढे गेलेली नाही. असे असताना आता एमएमओपीएलविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल झाली आहे.

आणखी वाचा-महात्मा गांधींबाबतची बदनामीकारक विधाने: महनीय व्यक्तींची विटंबना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश द्या

एमएमओपीएने एसबीआयसह कॅनरा बँक,आयडीबीआय बँक,इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि अन्य काही बँकांकडून कर्ज घेतले आहे. आता एसबीआयने एमएमओपीएलकडून ४१६.०८ कोटींच्या थकबाकी वसूलीसाठी दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एमएमओपीएलच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी एमएमओपीएलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर याबाबत एमएमओपीएल कायदेशीर सल्ला घेत असल्याचे रिलायन्स इन्फ्राकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bankruptcy petition filed by sbi against mumbai metro one mumbai print news mrj