प्राप्तिकराचा परतावा भरण्याची असलेली ३१ मार्चची अंतिम मुदत आणि या आठवडय़ात आलेल्या सुटय़ा या पाश्र्वभूमीवर देशभरातील सर्व प्रमुख बँकांनी आपापल्या शाखा २९ ते ३१ मार्च या दरम्यान सुरूच ठेवाव्यात असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने काढले आहेत. करभरणा करणाऱ्यांची पंचाईत होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत. २९ मार्चला गुड फ्रायडे असून ३० व ३१ मार्चला अनुक्रमे शनिवार-रविवार आहे.
करपरतावा भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. मात्र, होळी, धुळवड व गुड फ्रायडे व त्यानंतर शनिवार-रविवार अशा ओळीने सुटय़ा आल्याने करभरणा करणाऱ्यांसाठी अडचण निर्माण झाली होती. करदात्यांची ही अडचण ओळखूनच रिझव्‍‌र्ह बँकेने २९ ते ३१ मार्च या दरम्यान सर्व बँकांनी आपापल्या शाखा करसंकलनासाठी सुरू ठेवाव्यात असे आदेश दिले आहेत. दिवसभराच्या कामकाजाखेरीज काही अतिरिक्त तासांसाठीही या शाखा सुरू ठेवण्याची सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने केली आहे. तसेच करदात्यांना करभरणा करणे अधिक सोपे व्हावे यासाठी काही निवडक बँकांनी निवडक एटीएमवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, प्राप्तिकर व अप्रत्यक्ष कर कार्यालयेही ३० व ३१ मार्च रोजी सुरूच राहणार आहेत.

Story img Loader