मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे पालिका प्रशासनाचे हसे झाले. त्यामागील कारण शोधण्यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीने मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे जोडणीत त्रुटी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. मात्र कोणाही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले नसल्याचे कळते आहे. त्यामुळे या घोडचुकीला जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसून ते अधिकारी यातून सहिसलामत सुटल्याची चर्चा मुंबई महापालिकेत सुरू आहे.
गोखले पूलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली असली तर वाहनचालकांना दिलासा मिळाला नव्हता. अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. दोन पुलांमध्ये दीड- दोन मीटरचे अंतर निर्माण झाल्यामुळे बर्फीवाला पूल बंद ठेवण्यात आला होता. या सगळ्या प्रकारात पालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला. याप्रकरणी चौकशी करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या प्रकरणात नक्की नियोजन का फसले हे शोधण्यासाठी सत्यशोधन अहवाल तयार करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले. त्यासाठी मे महिन्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नेमणूक करण्यात आली होती.
हेही वाचा – गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
या प्रकरणी सैनी यांनी तब्बल दोन महिन्यांनी आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. बर्फिवाला पुलाची एक बाजू नुकतीच सुरू झाली असून जॅकने पूल उचलण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे. मात्र नियोजनात झालेला ढिसाळपणा, त्यामुळे पालिकेची डागाळलेली प्रतिमा, नागरिकांना झालेला मनस्ताप या सगळ्याकडे पालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. गोखले आणि बर्फीवाला पूल जोडणीतील त्रुटी या मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे झाले आहे. तसे सादर झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत दोन प्रशासनात समन्वय नसल्याने याबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
प्रशासनाचे म्हणणे काय?
रेल्वे प्रशासनाने रेल्वेवरील पुलांची उंची वाढवल्यामुळे हे अंतर निर्माण झाले असल्याचे पालिका प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. बर्फीवाला पूल एमएसआरडीसीने बांधलेला असल्यामुळे त्याबाबतची माहिती प्रशासनाकडे नाही, असेही प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे या दोन पूलांमध्ये अंतर पडल्याची बाब पालिका प्रशासनाला माहीत नव्हती असे नाही. मात्र आधी गोखले पूल सुरू करून मग बर्फीवाला पूलाबाबतचा निर्णय घेऊ अशी भूमिका तत्कालिन अधिकाऱ्यांनी मिळून घेतली. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक फटका बसला नाही. मात्र, दूरदृष्टी किंवा निर्णय क्षमतेबाबत प्रश्न उभे राहिले होते. यापुढे असे घडू नये म्हणून काय केले पाहिजे हे ठरवणे हा सत्यशोधन अहवालाचा मुख्य उद्देश्य होता, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.