संस्कृत साहित्यात एका वेगळ्या पठडीचा नाटककार म्हणून सर्वपरिचित असलेल्या भासाच्या नाटकांचा शोध लागून यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रुईया महाविद्यालय संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुईया महाविद्यालयात रविवार, ३ फेब्रुवारी रोजी भास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भासाच्या ‘मध्यमव्यायोग’ या नाटकाचे मराठी रूपांतर असलेल्या ‘प्रिया बावरी’ या नाटकाच्या प्रयोगाने दिवसभर चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रा. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग रूईया महाविद्यालयाच्या सभागृहात रंगेल. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत.
संस्कृत साहित्यात संस्कृत नाटकांना एक वेगळेच स्थान आहे. महाकवी कालिदासाच्या महाकाव्यांप्रमाणेच भासाची नाटके संस्कृतप्रेमी आणि नाटय़प्रेमींना भुरळ घालत आली आहेत. मात्र कैक शतकांपूर्वी भासाने रचलेली ही नाटके बऱ्याच मोठय़ा काळापर्यंत सापडत नव्हती. मात्र १९१२मध्ये भासाची १३ नाटके पुन्हा प्रकाशात आली.
या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने रुईया महाविद्यालयात भास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभर चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात नाटककार भास व त्याच्या नाटकांचे महत्त्व या विषयावर डॉ. अंजली पर्वते व डॉ. कमल अभ्यंकर यांची व्याख्याने होतील. त्यानंतर ‘भास-नाटय़संगीत’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. भासाचे एक महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘कर्णभारम्’ डॉ. मंजुषा गोखले आणि प्रसाद भिडे हे या नाटकाचे अभिवाचन करतील. त्यानंतर डॉ. वैशाली दाबके यांचे व्याख्यान होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात, आपल्याला भासाच्या नाटय़कृतीवर मराठी नाटक का करावेसे वाटले, भास हा नाटककार म्हणून कसा भासला, या विषयावर प्रा. वामन केंद्रे यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर भासाच्या ‘मध्यमव्यायोग’ या नाटकाचे मराठी रुपांतर असलेल्या ‘प्रिया बावरी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
या महोत्सवाचे पहिले सत्र रुईया महाविद्यालयाच्या तळ मजल्यावरील जी-१२ या सभागृहात होणार असून दुसरे सत्र महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहात होणार आहे.
भास महोत्सवात ‘प्रिया बावरी’
संस्कृत साहित्यात एका वेगळ्या पठडीचा नाटककार म्हणून सर्वपरिचित असलेल्या भासाच्या नाटकांचा शोध लागून यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रुईया महाविद्यालय संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुईया महाविद्यालयात रविवार, ३ फेब्रुवारी रोजी भास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 02-02-2013 at 01:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bash festival in ruia on sunday