मुंबई : लोकल प्रवास करताना रात्रीच्या वेळी तिकीट तपासनीस पथक नसल्याने, बहुसंख्य प्रवासी विनातिकीट प्रवास करीत होते. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने रात्रीचे तिकीट तपासनीस पथक सज्ज केले. या पथकाला ‘बी अवेअर टीटीई मॅनिंग ॲट नाईट’ (बॅटमॅन) असे नाव देण्यात आले आहे. ‘बॅटमॅन’द्वारे रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात येणार असून प्रवाशांनी रात्री विनातिकीट प्रवास करू नये असा या मागील उद्देश आहे.
पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. या विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. याद्वारे विनातिकीट प्रवासी कमी होत होते. मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत तिकीट पथकाद्वारे कडक तपासणी केली जात होती. मात्र रात्रीच्या वेळी तपासणी होत नसल्याचा भ्रम काही प्रवाशांमध्ये होता. त्यामुळे बिनधास्तपणे प्रथम श्रेणी, वातानुकूलित लोकलमधून प्रवासी विनातिकीट प्रवास करीत होते. या प्रवाशांवर अटकाव करण्याची तिकीटधारक प्रवाशांकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने ‘बॅटमॅन’ मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा – सातारा : रोहित शेट्टी यांच्या सिंघम – थ्री चित्रीकरणाने वाईचा गणपती मंदिर परिसर उजळला
हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?
हेही वाचा – महाविकास आघाडीचे अखेर ठरले! ‘हा’ पक्ष लढवणार बुलढाण्याची लोकसभा
११ मार्च रोजी रात्री ‘बॅटमॅन’ पथकाची गस्त सुरू झाली. या मोहिमेला सुरुवात झाल्यापासून अंदाजे २,३०० विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. विनातिकीट प्रवाशांवरील कारवाईदरम्यान रेल्वेने सुमारे ६.३० लाख रुपये दंड वसूल केला.