मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सुरू झालेली रस्सीखेच संपण्याचे अजून नाव दिसत नाही. ठाणे, सातारा, नाशिक या जागांवरून महायुतीत तर सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत तुटेपर्यंत ताणले गेले आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मित्रपक्ष तसेच स्वपक्षीय खासदार असा दुहेरी दबाव आला आहे. या अस्वस्थेपायीच महायुती किंवा महाविकास आघाडीला अद्याप जागावाटपांची अधिकृतपणे घोषणा करता आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिकमध्ये आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी सूचना भाजपने केल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला. तसेच ही माहिती आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगत भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची अधिकच कोंडी केली आहे. नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी दिल्यास जातीचे ध्रुवीकरण होईल, असे शिंदे गटाचे म्हणणे असून त्याचा फायदा ठाकरे गटाला होईल, असे गणित मांडले जात आहे. दुसरीकडे अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच हेमंत गोडसे यांनी शनिवारपासून प्रचाराला सुरुवात केली.

हेही वाचा >>> Lok Sabha Election: सनी देओलचा पत्ता कापला, भाजपाच्या आठव्या यादीत किती नावं? कुणाला मिळालं तिकिट?

साताऱ्यात उदयनराजे भोसले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी भाजपने त्यांची अधिकृतपणे उमेदवारी अद्याप तरी जाहीर केलेली नाही. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीकडे असून, ही आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे, असा अजित पवार गटाचा ठाम दावा आहे. उदयनराजे यांनी आपल्या पक्षाकडून लढावे, अशी अजित पवारांची भूमिका आहे. उदयनराजे यांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे नाही. कारण यापूर्वी उभयतांमध्ये वितुष्ट होते. साताऱ्याचा तिढा यातून कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी लढण्याची मानसिकता केली आहे. त्यानुसार भाजप किंवा राणे समर्थकांनी तयारी सुरू केली असली तरी शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत हे माघार घेण्यास तयार नाहीत. सामंत यांना आपल्या भावाला उभे करायचे आहे. सामंत यांचे बंधू निवडून येऊ शकत नाहीत, असा भाजपचा सर्वेक्षणातील निष्कर्ष आहे. महायुतीत या जागेचा वादही अद्याप सुटलेला नाही. 

महाविकास आघाडीतही तिढा कायम 

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळालीच पाहिजे, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह असला तरी शिवसेना माघार घेण्यास तयार नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव विश्वजित कदम व अन्य काँग्रेस नेत्यांनी मांडला असला तरी दिल्लीतील नेत्यांची त्याला अजून तरी मान्यता नाही. भिवंडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटू शकलेला नाही. दक्षिण मध्य मुंबईची जागा मिळावी ही काँग्रेसची मागणी असली तरी शिवसेनेने सांगलीच्या जागेवरील दावा मागे घ्या मग बघू, अशी भूमिका घेतली आहे. एकूणच महाविकास आघाडीतही अद्याप सहमती होऊ शकलेली नाही.  

गुंतागुंत कुठे?

’दक्षिण-मध्य मुंबई : काँग्रेसची मागणी असली तरी शिवसेनेने, ‘सांगलीवरील दावा मागे घ्या मग बघू,’ अशी भूमिका घेतली आहे.

’नाशिक : या जागेसाठी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ इच्छुक आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यास तयार नाहीत.  दुसरीकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी शनिवारपासून प्रचाराला सुरुवात केली.

सातारा : भाजपच्या उदयनराजे यांनी आपल्या पक्षाकडून लढावे, अशी अजित पवारांची भूमिका आहे. उदयनराजे यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचे नाही. ’रत्नागिरी-सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लढण्याची मानसिकता केली असली तरी शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत माघार घेण्यास तयार नाहीत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battle for seats in mahayuti and maha vikas aghadi alliance in lok sabha election zws