केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी ठाण्यातील वर्तकनगर भागात केलेल्या विकास कामांच्या शुभारंभामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली असतानाच या कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेला डावलले गेल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्याने शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत.
वर्तकनगरमधील रस्त्याचे कॉक्रिटीकरण तसेच २४ तास पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ सोहळा रविवारी पवारांच्या हस्ते झाला. या प्रभागात काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि शिवसेनेच्या विमल भोईर हे नगरसेवक आहेत. शिवसेनेचा प्रभाग असतानाही विक्रांत चव्हाण यांनी पवारांच्या हस्ते हा सोहळा आयोजिल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. या सोहळ्याला स्थगिती देण्याऐवजी रस्त्याच्या कामाच्या फायलींवर ऐनवेळी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्वाक्षरी केल्याने संतापलेले ओवळा-माजीवडय़ाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना धारेवर धरल्याचे बोलले जाते.
महापालिकेने शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी आखलेल्या कार्यक्रमात वर्तकनगर भागातील या दोन्ही कामांचा समावेश नव्हता. वर्तकनगरचा परिसर आमदार प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे येथील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण तसेच २४ तास पाणी पुरवठय़ाच्या प्रकल्पांसाठी सरनाईक गेल्या काही वर्षांपासून सतत प्रयत्न करत आहेत. असे असताना स्थानिक नगरसेवक या नात्याने काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी मुंब््रयात आलेले शरद पवार यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ सोहळा आयोजित केल्याने शिवसेनेत अस्वस्थता होती. या प्रभागात चव्हाण यांच्यासोबत महिला गटातून शिवसेनेच्या विमल भोईर निवडून आल्या आहेत. या सोहळ्यातून भोईर यांना डावलले गेल्याचा शिवसेनेचा आक्षेप होता. तसेच रस्त्याच्या कामांना अंतिम मंजुरी मिळाली नसल्याचाही शिवसेनेचा आक्षेप होता. त्यामुळे महापौरांनी स्वतच्या अधिकारात वर्तकनगरमधील सोहळा स्थगित करावा, अशी शिवसेना नगरसेवकांची मागणी होती. असे असताना महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाच्या फायलीला हिरवा कंदील दाखविल्याने संपातलेले आमदार सरनाईक यांनी त्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. यावेळी महापौरांनीही सरनाईक यांना जशास तसे उत्तर दिल्याने शाब्दिक चकमक उडाल्याचे सांगितले जाते.
छे! असे काही नाही!!
अशी कोणतीही शाब्दिक चकमक उडाल्याच्या वृत्ताचे सरनाईक आणि महापौर पाटील या दोघांनीही खंडन केले आहे. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही अशा स्वरुपाचा कोणताही प्रकार झालेला नाही, असे सांगितले.
पवारांच्या दौऱ्यानंतर सेनेत चकमकी
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी ठाण्यातील वर्तकनगर भागात केलेल्या विकास कामांच्या शुभारंभामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली असतानाच या कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेला डावलले गेल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यात
First published on: 21-05-2013 at 02:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battle in shivsena after pawar visit