मुंबई : सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचे विधिमंडळात पडसाद उमटले. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. विधान परिषदेत अनिल परब आणि चित्रा वाघ हे या विषयावरून हमरीतुमरीवर आले होते. आमचा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध प्रश्नांवरून विरोधकांनी कामकाज बंद पाडल्याची आजवरची परंपरा सध्याच्या अधिवेशनात खंडित झाली असून यावेळी चक्क सत्ताधारीच अनेकवेळा कामकाज रोखत असल्याचे चित्र आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनीच सभागृह बंद पाडले. भाजपचे अमित साटम यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत तिच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगत या प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले, विशेष चौकशी पथकाचा अहवाल अद्याप का आलेला नाही, अशी विचारणा केली. दिशा सालियनचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. सुरुवातीला पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे निष्कर्ष काढले होते आणि या प्रकरणात कोणतीही पुढील कारवाई करण्यात आली नाही. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आता न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्री यात सहभागी असल्याचा संशय दिशाच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या माजी मंत्र्याची चौकशी करण्याची मागणी साटम यांनी केली.
साटम यांच्या मागणीस अर्जुन खोतकर, मंत्री नितेश राणे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पाठिंबा दिला. बलात्काराचा आरोप झालेल्या व्यक्तीला अटक करावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून त्यानुसार या माजी मंत्र्याला अटक करा अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. अखेर सत्ताधारी आमदांनी गोंधळ सुरू केल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिशा सालियन मृत्यू प्रकरण उपस्थित केले. पोलीस यंत्रणेने माहिती लपवून ठेवली आहे. मुंबईच्या माजी महापौर यांनी प्रकरण दाबून टाकण्यासाठी सालियन यांच्या घरी जाऊन दमदाटी केली. त्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवले होते, असा आरोप केला. यावरून उमा खापरे, चित्रा वाघ यांनी भाष्य केले. प्रवीण दरेकर यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले.
बदनामीचे षड्यंत्र आदित्य ठाकरे
गेली पाच वर्षे बदनामीचे षड्यंत्र चालू आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे तर न्यायालयात बोलू, पण महत्त्वाची गोष्ट आहे की, आम्ही या सरकारला एका अधिवेशनात उघडे पाडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कालच सांगितले आहे की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार का, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.
चित्रा वाघ अनिल परब यांच्यात खडाजंगी
अनिल परब यांनी चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणावरून डिवचले होते. त्याला उत्तर देताना वाघ म्हणाल्या, संजय राठोड प्रकरणी तेव्हा तुम्ही गप्प होता. तुम्ही शेपूट घालून बसला होता. उद्धव ठाकरेंनी राठोडला क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जाब विचारा. ठाकरेंनी क्लिन चिट दिली नसती तर संजय राठोड आज मंत्री नसते. मला हलक्यात घेऊ नका. परब आणि वाघ यांच्यातील वाद वैयक्तिक पातळीवर गेल्याने ही नळावरची भांडणे बंद करा, असा सल्ला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
..तर तुमच्यावरही उलटेल, उद्धव ठाकरे यांचा इशारा
दिशा सालियन प्रकरणावर ठाकरे कुटुंबाचा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल तर सर्वांचीच पंचाईत होईल. कारण खोट्याचा आधार घेत असाल तर ते तुमच्यावरही उलटेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. प्रत्येक अधिवेशन आले की हा मुद्दा बाहेर काढला जाते. मागच्या अधिवेशानात हा मुद्दा कसा आला नाही, याचेच आपल्याला आश्चर्य वाटले होते. यात नवीन काहीच नाही, असा उपरोधिक टोला ठाकरे यांना लगावला.