प्रसाद रावकर
भायखळय़ातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच मुंबईकरांची राणीची बाग. या राणीच्या बागेत नुकत्याच झालेल्या बारसे सोहळय़ावरून सध्या राजकारण तापलं आहे. शिवसेना आणि भाजप हे परस्परांविरोधात एकही मुद्दा सोडत नाहीत. महापालिका निवडणूक जवळ आल्याचे लक्षण आणखी ते कोणते?
कुणे एकेकाळी राणीची बाग मुंबईकरच नव्हे तर देश, विदेशातील पर्यटकांचीही आकर्षण बनली होती. मात्र राणीच्या बागेतून हळूहळू प्राणी कमी होत गेले. रिकाम्या पिंजऱ्यांमुळे प्राणिसंग्रहालयाची रयाच गेली. मग पर्यटकांनीही राणीच्या बागेकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने राणीच्या बागेचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. देश, विदेशातील प्राणी, पक्षी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राण्यांना अनुकूल असा अधिवास असलेले आधुनिक पिंजरे उभारण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर परदेशातून हम्बोल्ट पेंग्विनही दाखल झाले. त्यापाठोपाठ आणखी काही वन्य प्राणीही राणीच्या बागेत आणण्यात आले आणि प्राणिसंग्रहालयाचा नूरच बदलला. पर्यटकांची पावले पुन्हा राणीच्या बागेकडे वळू लागली आणि पालिकेच्या तिजोरीत बक्कळ महसुलाची भर पडू लागली. ही झाली जमेची बाजू. राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे धनी व्हावे लागले. शिवसेनेने युवराजांचा हट्ट पुरविण्यासाठी राणीच्या बागेत पेंग्विन आणल्याचा आरोप करीत विरोधकांनी उद्धार सुरू केला. गेली अनेक वर्षे पालिकेत सत्तास्थानी मांडीला मांडू खेटून बसणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये निरनिराळय़ा कारणांवरून खटके उडू लागले आणि अखेर युतीला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर तर भाजपने शिवसेनेला थेट लक्ष्य केले. पेंग्विनच्या देखभालीचे कंत्राट असो वा रस्त्यांची कामे, भाजपने शिवसेनेविरुद्ध रानच उठविले. भाजपच्या म्हणण्यात तथ्य असेलही. पण त्यात राजकारणाचा सूर अधिक होता.
औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातील वाघाची जोडी डिसेंबर २०२० मध्ये राणीच्या बागेत दाखल झाली. वाघाचे नाव शक्ती आणि वाघिणीचे नाव करिश्मा ठेवण्यात आले. या जोडीच्या पोटी बालदिनी, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी मादी बछडय़ाचा जन्म झाला. तत्पूर्वी म्हणजे १८ ऑगस्ट २०२१ रोजी मोल्ट आणि फ्लिपर या पेंग्विन दाम्पत्याच्या पोटी एका गोंडस पिल्लू जन्माला आले. ही गोड बातमी मुंबईकरांपर्यंत पोहोचायला हवी होती. पण तसे झाले नाही. पालिका आणि प्राणिसंग्रहालयाने ही गोड वार्ता दडवून ठेवली. अगदी विरोधी पक्षाच्या एकाही नगरसेवकाला ते कळू शकले नाही. याबद्दल प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. त्यामागचं कारण आज पावतो समजू शकलेलं नाही. अचानक एकेदिनी महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन पेंग्विन जन्माची बातमी पत्रकारांमार्फत मुंबईकरांना दिली. अगदी त्याचप्रमाणे गेल्या मंगळवारी महापौरांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांच्या साक्षीनं वाघाच्या मादी बछडय़ाचं ‘वीरा’, तर पेंग्विन पिल्लाचं ‘ऑस्कर’ असं नामकरण केलं. अखेर पत्रकार, अधिकाऱ्यांच्या साक्षीने बारसं उरकण्यात आलं. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे हळूहळू राजकीय मल्ल आखाडय़ात उतरू लागले आहेत. राणीच्या बागेतील नामकरण सोहळाही टीकेचा विषय बनला. दुकानांवरील पाटय़ा मराठी भाषेत असाव्यात असा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पेंग्विन पिल्लाचे नाव इंग्रजीत चालते का, अशी डरकाळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या चित्रा वाघ यांनी मारली. पक्षप्रमुखांवर झालेला शाब्दीक हल्ला पचनी न पडल्याने महापौर किशोरी पेडणेकर सरसावल्या. हत्तीला भविष्यात होणाऱ्या पिल्लाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाला होणाऱ्या पिल्लाला ‘चिवा’ ठेऊ या, असं प्रत्युत्तर महापौरांनी भाजपला दिलं. राजकारणाच्या धुळवडीत ‘चंपा’ कोणाला उद्देशून हिणवलं म्हटलं जातं याची इथे फोड करायची गरज नाही. अवघ्या महाराट्राला ते माहीत आहे. पण ‘चिवा’ म्हणजे कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण तात्काळ त्याचंही उत्तर मिळालं. ‘चिवा’ म्हणजे चित्रा वाघ असंच महापौरांना म्हणायचं असणार यातही शंका नाही. महापौरांच्या प्रत्युत्तरामुळे भाजप नगरसेवकही खवळले. मग भाजप नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनीही शाब्दिक चकमकीत उडी घेतली आणि निषाणा साधला.
‘राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते ओळखा पाहू कोण’ असा प्रश्न उपस्थित केला. दादरच्या महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेतील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात हलविण्यात आलं आहे. त्यामुळे सध्यात त्याच राणीच्या बागेत वास्तव्यास आहेत. म्हणजे भाजप नगरसेविकेचा रोख महापौरांकडेच असल्याचे स्प्ट होतं. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली, पण अद्याप त्यावर कुणीही बोललेलं नाही. ‘ऑस्कर’, ‘चंपा’ अन् ‘चिवा’ प्रकरणातही तसंच काहीसं होणार असं आता दिसू लागलं आहे. मुळात मुंबई आणि मुंबईकरांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुरेसा पाणीपुरवठा, स्वच्छता, चांगले रस्ते, प्रदुषण, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, निवासी दाखला नसलेल्या इमारती असे अनेक प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. पण त्याकडे जबाबदारीने लक्ष देणारा एकही लोकप्रतिनिधी नसावा हे दुर्दैव आहे. केवळ मतपेढीवर मलमपट्टी करण्यापुरती कामे करुन करून समाधान मानणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या मोठी आहे. सर्वच पक्षांमध्ये अशा लोकप्रतिनिधींचा भरणा आहे. केवळ राजकारणात आरोपप्रत्यारोपांची राळ उडवून मनोरंजन करणारे नेते मात्र थोडेथोडके नाहीत. आता पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. केवळ राजकारणात रंगणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं की नागरी समस्या सोडविण्याची क्षमता असलेल्यांना मत द्यायचं हे मतदारांनी ठरवायचं आहे. prasadraokar@gmail.com