मुंबई : बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गतवर्षी प्रथमच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र यंदा या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा गतवर्षीच्या तुलनेत फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे.

यंदा राज्यभरातून ६७ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे शहरातून सर्वाधिक तर गडचिरोली, सिंधुदुर्ग, भंडारा, जालना, हिंगोली या जिल्ह्यातून सर्वात कमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेला गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. या अभ्यासक्रमांसाठी २५ डिसेंबर २०२४ ते २० मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

या अर्ज नोंदणी प्रक्रियेमध्ये राज्यभरातून ६७ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी पुण्यातून १३ हजार १९९ विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याखालोखाल मुंबईतून १२ हजार ७७२ आणि ठाण्यातून ७ हजार ८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नागपूरमधून ३१३४ विद्यार्थ्यांनीच या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरले आहेत. तसेच सर्वात कमी प्रतिसाद गडचिरोली, सिंधुदुर्ग, भंडारा, जालना, हिंगोली या पाच जिल्ह्यांमधून मिळाला आहे.

गडचिरोलीतून १२२ विद्यार्थी आणि सिंधुदुर्गातून १७६ विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नोंदणी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीतही जेमतेम ३५६ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. एआयसीईटीने दिलेल्या निर्देशांनुसार गतवर्षी प्रथमच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी १ लाख ८ हजार ७४१ जागांसाठी ८० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांसाठीची २९ मे आणि ४ ऑगस्ट अशा दोन दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. दोनवेळा झालेल्या परीक्षेमुळे प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला होता. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार आहेत.