मुंबई : मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बीसीजी लस क्षयरोग प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरण्यास सुरूवात झाली आहे. प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी करण्यात आली. याअंतर्गत १२ प्रशासकीय विभागांत पहिल्याच दिवशी १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधासाठी मुंबईतील सर्व नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ मिळावा, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच जवळचे आरोग्य केंद्र, दवाखाना आणि संबंधित पालिका विभागात कार्यरत क्षयरोग कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा – मुंबईच्या कमाल तापमानात घट

बीसीजी ऐच्छिक लसीकरण असून पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेतली जाते. मुंबईत त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी सप्टेंबरपासून आरोग्य स्वयंसेविका आणि आशासेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या धोरणानुसार, २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे ध्येय आहे. महानगरपालिका क्षेत्रात त्यानुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबई महानगरात २०२३ मध्ये ५० हजार २०६ क्षय रुग्णांची नोंद झाली असून ते उपचाराधीन आहेत. क्षयरोगाचा प्रसार टाळण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधासाठी २ नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम यांच्याद्वारे मुंबईत प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबईच्या १२ प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात येत आहे. मुंबईत एकूण १२ नियंत्रण विभाग आहेत. या मध्यस्थी विभागांमधील १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि ६ अतिजोखीम गटातील लाभार्थ्यांची निवड लसीकरणासाठी केली जाते.

हेही वाचा – महापालिकेच्या भूमिकेचा निषेध! १६ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन

अतिजोखीमीचे गट

– गेल्या ५ वर्षातील क्षयरोगाने बाधित रुग्ण

– मागील ३ वर्षातील क्षयरोग रुग्णांचे घरगुती संपर्कातील व्यक्ती

– मधुमेही

– धूम्रपान करणारे

– कुपोषित

– ६० पेक्षा अधिक वय असणारे

लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘सीवाय – टीबी’ चाचणी

क्षय जंतूचे संसर्ग झालेले, पण अद्याप लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘सीवाय – टीबी’ ही अत्यंत सोपी, माफक दरातील आणि प्रभावी तपासणी महानगरपालिका क्षेत्रात मोफत उपलब्ध झाली आहे. क्षयरोग रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याची शक्यता असते. त्यांच्या तपासण्यासाठी ही चाचणी प्रामुख्याने सुरू करण्यात आली आहे. जर चाचणी सकारात्मक आली तरच संपर्कातील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधे घेण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader