लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वरळी, बीबीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत तयार असलेल्या ५५६ घरांचा ताबा मार्चअखेरपर्यंत देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जाहिर करण्यात आले होते. मात्र आता या घरांच्या ताब्यासाठी बीडीडीवासियांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण या घरांसाठी अद्याप निवासी दाखला (ओसी) मिळालेला नसून सध्या मुंबई मंडळाकडून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या घरांना निवासी दाखला देण्यात येणार आहे. तो मार्चअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच आता रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे.
ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या तिन्ही ठिकाणी पुनर्वसन इमारतींची पहिल्या टप्प्यातील कामे वेगाने सुरु असून वरळीतील ५५६ घरे तयार झाले आहेत. वरळीत ३३ मजली १२ पुनर्वसित इमारतींची कामे सुरु असून त्यातील दोन इमारतीतील ५५६ घरांचे काम पूर्ण झाले आहे. ५५० चौ. फुटांची ही घरे पूर्ण झाल्याने या घरांचा ताबा मार्चमध्ये देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.
राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातही वरळीतील ५५६ घरांच्या ताब्याचा समावेश करण्यात आला. पण आता मात्र मार्चअखेरपर्यंत या घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता नसून आता घरांच्या ताब्यासाठी एप्रिल महिना उजाडण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. कारण या घरांसाठी अद्याप निवासी दाखला मिळालेला नाही. मुंबई मंडळाला निवासी दाखल्याची प्रतीक्षा आहे. म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्याने आता निवासी दाखला हा म्हाडा प्राधिकरणाकडूनच मिळत असला तरी यासाठी अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते. त्याची प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. हे प्रमाणपत्र मिळून प्रत्यक्ष निवासी दाखला मिळण्यासाठी मार्चअखेर उजाडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मार्चअखेरपर्यंत निवासी दाखला मिळणार असल्याने घराचा ताब्याचा मुहूर्त आता एप्रिलमध्ये गेल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बीडीडीवासियांची उत्तुंग इमारतीतील ५०० चौ. फुटाच्या घरात वास्तव्यास जाण्याची प्रतीक्षा काहीशी लांबणार आहे. दरम्यान वरळीतील ३३ मजली दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरे ही वरळीतील चाळ क्रमांक ३०,३१ आणि ३६ मधील पात्र रहिवाशांना वितरीत केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई मंडळाकडून यापूर्वीच सोडत काढून पात्र रहिवाशांना घराची हमी अर्थात कोणत्या रहिवाशाला कोणत्या मजल्यावर, कोणत्या क्रमांकाचे घर वितरीत केले जाणार हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. मात्र आता त्यासाठी त्यांना एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.