१६ हजार कुटुंबांना लाभ
मुंबई शहरातील नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी येथे असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी शासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, येत्या मार्चपासून प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरुवात केली जाणार आहे. ९३ एकर जागेवरील पुनर्विकास हे एक आव्हान असून एल अँड टी, गोदरेज, शापुरजी, टाटा हौसिंग आदी नामांकित कंपन्यांच्या सहभागाने बीडीडी चाळींचा कायापालट केला जाणार आहे. या पुनर्विकासामुळे शासनाला हजारो परवडणारी घरेही उपलब्ध होणार असून, यासाठी ई-निविदेच्या माध्यमातून संपूर्ण पारदर्शक प्रकिया वापरली जाणार आहे.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात बडय़ा विकासकांना सहभागी करून घेण्यात येणार असले, तरी नियंत्रण मात्र शासनाचेच राहणार आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि. किंवा म्हाडा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी त्यास दुजोरा दिला. हा प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले असून, कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे प्रकाश मेहता यांनी सांगितले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे घोडे २००९ पासून दामटविले जात असले तरी पुनर्विकासासाठी र्सवकष योजना आता तयार झाल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास कसा व्हावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाने वास्तुरचनाकारांकडून निविदा मागविल्या होत्या. पाच हजार भाडेकरूंचे पुनर्वसन केलेल्या वास्तुरचनाकारांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले होते. तब्बल २४ वास्तुरचनाकारांनी त्यात स्वारस्य दाखविले. त्यापैकी १३ वास्तुरचनाकारांची छाननीनंतर निवड करण्यात आली. तिन्ही चाळींचा स्वतंत्र आराखडा या वास्तुरचनाकारांनी सादर करावयाचा आहे. यापैकी एका आराखडय़ाची निवड केली जाणार असून त्यानुसारच या चाळींचा पुनर्विकास होईल, असेही गृहनिर्माण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. खासगी विकासकांमार्फत या चाळींचा पुनर्विकास केला जाणार असला, तरी हा प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावा यासाठी शासनाचे नियंत्रण असेल, असे प्रकाश मेहता यांनी सांगितले.
मुंबईत ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या २०७ बीडीडी चाळी आहेत. अतिशय तुटपुंज्या जागेत खुराडय़ात राहावे, तशी १६ हजार कुटुंबे या घरांमध्ये राहतात. ही सर्व बहुतांश मराठी कुटुंबे आहेत.