मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचे हक्काच्या घरात, उत्तुंग इमारतीत वास्तव्यास जाण्याचे स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण वरळीतील १२ इमारतींपैकी दोन इमारतींचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्चमध्ये या दोन इमारतीतील ५५० घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार घरांच्या वितरणाचा समावेश म्हाडाने आपल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात केला आहे.
हेही वाचा – मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
हेही वाचा – आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ४२ लाख रुग्णांवर उपचार!
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. सध्या या तिन्ही चाळीत पुनर्वसित इमारतींची कामे सुरु आहेत. वरळीतील मंडळाकडून १५५९३ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुमजली ३३ इमारती बांधल्या जाणार आहेत. ३३ पैकी १२ पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. दरम्यान यातील १२ पैकी दोन इमारतींचे काम ऑगस्टपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याने २०२५ मध्ये या घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचे नियोजन मंडळाचे होते. त्यानुसार आता या दोन इमारतींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काम पूर्ण करत इमारतींना निवासी दाखला देत मार्चपर्यंत ५५० घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यापूर्वी दिवाळीत, त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये घरांचा ताबा देण्यात येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र या तारखा चुकल्या असल्या तरी आता मार्चमध्ये बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कारण राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात वरळीतील ५५० घरांच्या वितरणाचा समावेश आहे. त्यामुळे आता ५५० बीडीडीवासीय उत्तुंग ४० मजली इमारतीत, ५५० चौ. फुटाच्या घरात राहण्यास जाणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान वरळी बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील पात्र ५५० रहिवाशांना उत्तुंग पुनर्वसित इमारतीतील ५०० चौ फुटाच्या घराच्या ताबा दिला जाणार आहे.