स्मार्ट मोबाइलधारक आपल्या मोबाइलबाबत निश्चिंत असतात. कारण त्यांच्या मोबाइलमध्ये १५ आकडी आयएमईआय क्रमांक असतो. मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर या क्रमांकाद्वारे तो कुठे आहे ते शोधता येतो. पण आता हा आयईएमआय क्रमांक तोडण्याचे सॉफ्टवेअरच बाजारात उपलब्ध झाल्याने चोरीला गेलेले मोबाइल शोधणे कठीण झाले आहे.
स्मार्टफोन वापरणे ही काळाची गरज बनली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे मोबाइल फोन घेत असतात. या मोबाइलमध्ये १५ आकडी आयईएमआय क्रमांक
(इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) असतो. त्यामुळे मोबाइल चोरीला गेला तरी या क्रमांकाद्वारे तो सहज शोधता येतो. पण आता बाजारात हे आयईएमआय क्रमांक तोडणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. कुठल्याही जुन्या किंवा स्वस्त मोबाइलचा आयईएमआय क्रमांक टाकून या मोबाइलचा डीएनए अर्थात ओळख नष्ट करता येते. म्हणजेच आयईएमआय क्रमांक नष्ट करून दुसरा आयईएमआय क्रमांक टाकता येतो. याबाबत माहिती देताना कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सांगितले की, मनीष मार्केट, फोर्ट आदी पसिरातील ग्रे मार्केटमध्ये मोबाइलच्या दुकानात या सॉफ्टवेअरद्वारे आयईएमआय क्रमांक तोडून दिले जातात. हल्ली चिनी बनावटीच्या हजार रुपयांच्या मोबाइलमध्येही आयईएमआय क्रमांक असतो. त्याचा आयईएमआय क्रमांक या चोरलेल्या मोबाइलमध्ये १०० रुपयांत टाकून दिला जातो. त्या मोबाइलचे १००० आणि सॉफ्टवेअरचे १०० असे ११०० रुपये त्यासाठी खर्च येतो. या नव्या सॉफ्टवेअरमुळे आम्हाला चोरीला गेलेले मोबाइल शोधता येत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.
या सॉफ्टवेअरमुळे स्मार्ट फोनमधील सगळ्या प्रकारचे मोबाइल ट्रॅकरचे सॉफ्टवेअर तोडता येतात. पण आयफोनमध्ये अजून असा तसा प्रकार होत नाही.
रेल्वेत मोबाइलची काळजी घ्या!
सर्वाधिक मोबाइल चोरीचे प्रकार हे रेल्वेत होतात. पूर्वी आयईएमआय क्रमांकाद्वारे आम्ही मोबाइल शोधू शकत होतो. पण आमच्या कुर्ला रेल्वेच्या हद्दीतील ७० मोबाइलचा अद्याप तपास लागलेला नाही, असे धुमाळ यांनी सांगितले. मुंबई रेल्वेतून ३ हजारांहून अधिक चोरलेल्या मोबाइलचा तपास लागलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे लोकांनी आता मोबाइल हरवू नये किंवा चोरीला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.