शिकण्याच्या किंवा दीर्घ प्रवासाच्या हेतूने दीर्घकाळ रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाने वेगळाच इशारा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी डिसेंबर अखेपर्यंत कामावर रूजू व्हावे किंवा राजीनामा द्यावा, एवढेच दोन पर्याय एअर इंडियाने त्यांच्यासमोर ठेवले आहेत.
कर्मचाऱ्यांनी आपली अंगभूत कौशल्ये अधिक परिणामकारक करावीत, त्यासाठी अधिकाधिक शिकावे, या प्रेरणेने एअर इंडियाने पाच वर्षांपूर्वी दीर्घकाळ सुटीचा पर्याय सुरू केला होता. या पर्यायानुसार कर्मचाऱ्यांना किमान दोन आणि कमाल पाच वर्षे बिनपगारी सुटी घेणे शक्य होते. या योजनेमुळे प्रतिवर्षी ३००० कोटी रुपये एवढय़ा वेतन बिलात काही कपात होईल, असा कंपनीचा कयास होता. तसेच सुटी घेतल्यानंतर या दोन किंवा पाच वर्षांच्या काळासाठी कर्मचाऱ्याची कंपनीतील नोकरी अबाधित राहणार होती.
एअर इंडियाच्या २१३ कर्मचाऱ्यांनी या सुटीचा लाभ घेतला आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी या सुटीचा वापर अपेक्षित कारणांसाठी न केल्याचे समोर आले. काहींनी ही सुटी घेऊन इतर क्षेत्रांमध्ये नोकरी धरली. काही जण दुसऱ्या एअरलाइन कंपन्यांमध्ये नोकरीला लागले. तर काही कर्मचारी परदेशात गेले, असे एअर इंडियातील सूत्रांनी सांगितले. कंपनीतील अनेक कर्मचारी येत्या दोन वर्षांत निवृत्त होणार आहेत. तसेच कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांची निवड अद्यापही केलेली नाही. त्यामुळे एअर इंडियाला मनुष्यबळाचा तुटवडा पडत आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाने परिपत्रक काढून दीर्घकाळ सुटीवरील कर्मचारी डिसेंबर अखेपर्यंत कामावर रूजू होणार नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे बजावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा