गडचिरोलीतील आदिवासींबाबत मी जे सांगतो, ते गांभीर्याने घ्या, हसण्यावारी घालवून माझी टिंगल करू नका. नाहीतर निवडणुकीत मतदारच तुम्हाला गांभीर्याने घेतील, असा इशारा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बुधवारी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला.
महावितरणच्या पायाभूत आराखडा योजनेच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी त्या जिल्ह्यातील आदिवासींच्या विजेच्या प्रश्नाला वाचा फोडली. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी मदत केली. या योजनेच्या माध्यमातून आदीवासींची घरे उजळली. सुविधांच्या माध्यमातून आदिवासींना लक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम बनविले जात आहे. मात्र आज त्यांच्याकडे बील भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची वीजजोडणी तोडण्यात आली असून आदिवासींची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्यचे सांगत किमान माणुसकीच्या दृष्टीने त्यांचे विज कनेक्शन जोडण्याची विनंती पाटील यांनी केली. त्यावर पैसै भरल्याशिवाय वीजजोडणी पूर्ववत होणार नाही. आता सवलती मिळणार नाहीत अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. एवढेच नव्हे तर आबांचे हे नेहमीचेच असते असे म्हणत संपूर्ण मंत्रिमंडळात हस्याची लकेर उमटली. त्यावर अस्वस्थ झालेल्या आबांनी वरील इशारा दिल्याचे कळते.

Story img Loader