जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चोराचा रविवारी सकाळी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक दास (३२) असे त्याचे नाव असून तो शनिवारी रात्री शीव येथील संजय गांधी नगरात दोन साथीदारांसह चोरी करण्यासाठी आला होता. त्या वेळी नागरिकांनी त्याला बेदम मारहणा करून बांधून ठेवले होते.
संजय गांधी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरटय़ा चोरीचे प्रकार घडत असल्याने तेथील रहिवासी संतप्त झाले होते. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास दीपक त्याच्या साथीदारांसह चोरी करण्यासाठी आला. एका बैठय़ा चाळीतील तिलकराम चौहान यांच्या घरात हे तिघे शिरले. त्यांनी घरातील भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम मिळून साडेसात हजारांचा ऐवज चोरला. त्या दरम्यान चौहान यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे आसपासचे लोक गोळा झाले. या गदारोळात दीपकचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले तर दीपक जमावाच्या तावडीत सापडला.
जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी अवस्थेतील दीपकला पहाटे पावणेतीनच्या सुमारास शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र रविवारी सकाळी अकराच्या सुमारास  उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. पोलिसांनी या प्रकरणी २० ते २५ अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चौहान यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे लोक गोळा झाले. या गदारोळात दीपकचे दोन साथीदार पळून गेले तर दीपक जमावाच्या तावडीत सापडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा