मुंबईः प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा दावा करीत एका मुलाला निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात वांद्रे रेल्वे पोलीस गुन्हा दाखल  करण्याची शक्यता आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणातील मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यात २१ जुलैच्या घटनेप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण वांद्रे टर्मिनसबाहेर या मुलाला मारहाण केल्याची ध्वनीचित्रफीत वायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाला जमाव मारहाण करीत असून बुरखा घातलेली एक तरूणी या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या ध्वनीचित्रफीतीत दिसत आहे. समाज माध्यमांवर मंगळवारी ही ध्वनीचित्रफीत वायरल झाली. ही घटना २१ जुलै २०२३ ची असल्याचे वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. तरूण आणि तरूणी १६ वर्षांचे असून ते अंबरनाथ येथील घरातून पळून मुंबईत आल्याचा आरोप आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या कुटुंबीयांनी अंबरनाथ पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा >>> वाचन संस्कृती जपण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार; विलेपार्ले, चेंबूरमध्ये पुस्तक विक्री केंद्रे सुरू

मुलीचा शोध घेत असताना ती वांद्रे टर्मिनस येथून तरुणांसोबत शहर सोडण्याचा विचारात असल्याचे कुटुंबीयांना समजले. त्यानंतर जमाव वांद्रे टर्मिनस येथे पोहोचला आणि लखनौला जाणारी रेल्वे कोणत्या फलाटावरून निघणार याची त्यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्यानंतर जमावाने रेल्वे स्थानकात शिरून या तरूण, तरूणीला ताब्या घेतले आणि ते सर्वजण स्थानकाबाहेर आले. या दोघांना निर्मल नगर पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी आरपीएफला कळवले. रेल्वे स्थानकाच्या बाहेर या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी हे प्रकरण लव जिहाद असल्याचा दावाही ध्वनीचित्रफीतत करण्यात आला होता.

हेही वाचा >>> टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “त्यांनी आधी…”

अंबरनाथ पोलिसांनी अपहरण प्रकरणात तरुणाला ताब्यात घेतले होते आणि तो अल्पवयीन असल्याचा दावा करत त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. या घटनेनंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. ‘ही घटना २१ अथवा २२ जुलै रोजी वांद्रे रेल्वे स्थानकावर घडली. पण समाज माध्यमांवर आज ध्वनीचित्रफीत व्हायरल झाली. मग पोलीस काय करत होते? आजपर्यंत तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तपास किंवा तक्रार का नोंदवली नाही, असा सवाल पठाण यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beating in the name of love jihad bandra railway police to file a case mumbai print news ysh