अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची मोडतोड करून डॉक्टरला मारहाण केली. शिवाजी नगर येथे राहणारा अफजल कमाल खान (३०) या तरुणाचा घाटकोपर येथे अपघात झाला होता. राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच खान याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला व डॉक्टर प्रशांत आणि परिचारिका प्राची शिर्के यांना धक्काबुक्की करत मारहाण केली आणि अतिदक्षता विभागाच्या काचाही फोडल्या. घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला आटोक्यात आणले. याप्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

Story img Loader