लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत गोराई जेट्टी आणि समुद्र किनारा यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यात जेट्टी व समुद्र किनारा परिसरात रोषणाई करण्यात येणार असून पालिका त्याकरिता दोन कोटी ६९ लाख रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत सध्या सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत पश्चिम उपनगरात बोरिवलीला लागून असलेल्या गोराई परिसराला देखील सुशोभीकरणाचा स्पर्श होणार आहे. मुंबईपासून जवळ असलेला हा परिसर काहीसा अविकसित आहे. मूलभूत सोयीसुविधादेखील या परिसरात नाहीत. मात्र सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत या परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आर मध्य विभागाने त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित केला आहे. या कामासाठी २ कोटी ६९ लाख रुपये खर्च होणार आहे. या कामाचा दोष दायित्व कालावधी दोन वर्षांचा आहे.
आणखी वाचा- मुंबई किनारी मार्गाची भ्रमणगाथा अनुभवण्याची संधी
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. १६ विविध प्रकारची कामे या सुशोभिकरणांतर्गत केली जाणार आहेत. त्यात सुविधा शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभिकरण, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण अशी कामे केली जाणार आहेत.
या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत म्हणजे ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाईसंबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना पालिका आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली होती.