पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शनिवारच्या मुंबई दौऱ्यानिमित्त कोणीतीही पूर्वसूचना न देता अकस्मातपणे ससून डॉक दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींनाही या बंदीचा फटका बसला. अलीबागला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या पर्यटक मुंबईकरांना गेट वे तसेच मांडवा जेट्टीवर तासन्तास ताटकळत राहावे लागले. अतिविशेष व्यक्तींच्या दौऱ्यावेळी सागरी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई बंदरातील मच्छिमार व प्रवासी बोटींची ये-जा बंद करण्यात येते. पूर्वसूचना असल्यास मच्छिमारांना मासे घेऊन बोटी बंदरात आणण्याच्या दिवसाचे नियोजन करता येते. मात्र, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शनिवारच्या संपूर्णपणे खासगी असलेल्या मुंबई दौऱ्यानिमित्त अकस्मातपणे मासे खरेदी-विक्रीचे मोठे केंद्र असलेले ससून डॉक बंदर बंद ठेवण्याचा आदेश सरकारी यंत्रणेने दिला. त्यामुळे समुद्रातून ताजे मासे घेऊन आलेल्या अनेक मच्छिमार बोटींचे मासे तसेच पडून राहिले आणि त्यांचे मोठे नुकसान झाले, अशी नाराजी मच्छिमार संघटनांनी व्यक्त केली आहे.    

Story img Loader