बीड लोकसभा मतदारसंघात झालेली लढत ही पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी होती. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत बजरंग सोनावणे विजयी झाले. या विजयानंतर बजरंग सोनावणेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. बीडच्या केजरमध्ये बजरंग सोनावणेंवर जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी माझ्या विजयाचं श्रेय शरद पवार आणि मनोज जरांगेंना आहे असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.
विधानसभेत सहाच्या सहा उमेदवार आपले निवडून द्या
“बीड जिल्ह्यात सहा उमेदवार आहे, या सहाच्या सहा जणांना तुम्ही विधानसभेला निवडून द्या असं आवाहन मी आज तुम्हाला करतो आहे. केज विधानसभेचा आमदारही आपलाच होईल. अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे जो विभाग आहे ते काम करावं. मी खासदार कसा झालो हे दुखणं अनेकांना झालं आहे. मलाही मी खासदार होऊन एक महिना झाल्याचंही समजलं नाही. मी खरंच खासदार झालोय का? असं बायकोला विचारायचो.” असं बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.
हे पण वाचा- “तुम्ही आमचे शत्रू नाही, पण…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले, “समाजाला कळून चुकलंय…”
मी खासदार झालो हे आता मान्य करा
लोकसभा निवडणूक झाली, आता जाऊ द्या. मी पाच वर्षे खुर्चीला खुर्ची लावून बसणार आहे. मी खासदार झालो आहे हे आतातरी मान्य करा. खासदार काय असतो ते आता बीडच्या जिल्ह्याच्या लोकांना आम्ही कामाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. राज्यात सरकार आपलं येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या इच्छुकांची गर्दी आहे. दोन महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा असंही बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.
हे पण वाचा- Parliament Session : ‘या’ मराठी खासदारांनी घेतली हिंदीतून शपथ, तर तिघांचं इंग्रजीला प्राधान्य
माझ्या विजयाचं श्रेय मनोज जरांगेंना
माझ्या विजयाचं श्रेय मी मनोज जरांगेंना आणि शरद पवारांना देतो. मनोज जरांगेंनी मला जे द्यायचं ते दिलं आहे असं बजरंग सोनावणे म्हणाले आहेत. एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले या बजरंग सोनावणेला तिकिट मिळू नये यासाठीही प्रयत्न झाले. कामाचं श्रेय घेऊ नका पण आधी बीडचा विकास करा. जिल्ह्याला सधन करायचं स्वप्न पाहा. पालकमंत्री मुंडे म्हणाले की मी कन्फ्युज करतो. पण आज उपस्थितांना सांगतो आहे की मी दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. रात्री-अपरात्री कधीही फोन करा, रुग्णांसाठी माझे फोन चालूच असतील, मी पक्षपात करणार नाही असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.
बीडमध्ये जी निवडणूक झाली त्यात मनोज जरांगे फॅक्टरने काम केलं अशी चर्चा जिल्ह्यात रंगली होती. आज बजरंग सोनावणे यांनी जाहीररित्या हे मान्यच केलं आहे. कारण त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय हे मनोज जरांगे आणि शरद पवारांना दिलं आहे.