पैसा, प्रतिष्ठा, सुख आणि समुद्धीसाठी मुंबईसारख्या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारी माणसे तशी नित्याचीच. मात्र सध्या मुंबईत लोक येत आहेत ते घोटभर पाणी पिण्यासाठी. किमान चार दिवस तरी मुबलक पाणी पिता यावे या उद्देशाने दुष्काळग्रस्त जिल्हा बीडहून प्रदर्शनात दुकान थाटायच्या निमित्ताने महिला बचत गटातील मंडळी दाखल झाली आहेत.
ग्रामीण भागातील महिला कारागिरांसाठी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी एकूण ४० महिला शेकडो किलोमीटरचा लांब पल्लय़ाचा प्रवास करून काही पैशांसह पिण्याच्या पाण्याची सोय होईल, या आशेने वांद्रे रेक्लेमेशनच्या म्हाडा मैदानावर दाखल झाल्या आहेत. परंतु प्रदर्शनाच्या चार दिवसांनंतर डोळ्यात पाणी घेऊन परतावे लागण्याचे कटू सत्यही त्या सांगत आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजक कौशल्यनिर्माण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘ग्राम विकास व पंचायत राज्य विभागा’तर्फे सलग तेराव्या वर्षी ‘महालक्ष्मी सरस-२०१६’ हे प्रदर्शन १६ ते २८ जानेवारी या कालावधीसाठी भरविण्यात आले आहे. यात राज्यभरातील ४०० हून अधिक ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे आदीं प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्य़ावर दुष्काळाचे संकट कोसळले असतानाही जगण्याची उमेद, स्वप्न आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल, या अपेक्षेत काही महिला छोटय़ाछोटय़ा खेडय़ांतून या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
‘पाण्यासाठी दाही दिशा’ अशी अवस्था असलेल्या या महिला मुंबईतला मुबलक पाणीपुरवठा पाहून चकित झाल्या आहेत. ‘आमच्या गावात १५ दिवसांतून एकदा पाणी मिळते. तेही नक्की मिळेल याची शाश्वती नाही. अनेकदा एक हंडा पाणी मिळावे यासाठी रात्रभर रांगेत उभे राहवे लागते. त्यामुळे अर्धा ग्लास पाणी फेकण्याचा विचारही आम्हाला परवडणारा नाही. मुंबईत मात्र पुष्कळ पाणी आहे, असे आम्हाला कळले होते. त्यामुळे चार दिवस का होईना, आम्हाला पाणी प्यायला मिळेल या अपेक्षेने आम्ही इथे आलो आहोत. मात्र गेल्या चार दिवसांपासून इथे काही लोक सर्रास पाणी फेकून देताना दिसतात. त्यावेळी आम्हाला आमची पाण्यासाठी तहानलेली मुले आठवून डोळ्यात पाणी येते’, असे बीड जिल्ह्य़ातील घोडका राजुरी या खेडय़ातून आलेल्या संजीवनी पवार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा