अनेक टिकाऊ वस्तुंपासून ते आंतरराष्ट्रीय उत्पादनांची सहीसही नक्कल करून मिळणाऱ्या चामड्याच्या वस्तुंसाठी मुंबईत प्रसिद्ध असणाऱ्या धारावीतील चर्मोद्योगावर सध्या शासनाच्या निर्णयानंतर मरणकळा ओढविली आहे. महाराष्ट्रात जारी करण्यात आलेल्या गोहत्या बंदीच्या कायद्यामुळे मंदीच्या फेऱ्यातून सावरून पुन्हा उभे राहण्याच्या धडपडीत असलेल्या येथील उद्योजकांपुढे आता अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
सुरूवातीला चामड्याच्या वस्तुंचा महागडेपणा आणि आता गोमांसाला राजकीय पक्षांचा असलेल्या आक्षेपामुळे एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या धारावीतील चामड्याच्या या बाजारपेठेची रया गेल्याची येथील दुकानाचे मालक नाझी शेख यांनी सांगितले. नाझी शेख यांच्या दुकानापासून अर्ध्या किलोमीटवर असणाऱ्या दुकानाचे मालक शहानवाझ शेख यांचीही तीच व्यथा. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी १९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने आता आमच्या बाजारपेठेचा मृत्यू अटळ असल्याचे शेख सांगतात.
कोलकाता आणि चेन्नई येथील कातडी कमावण्याचे काम चालणाऱ्या कारखान्यांना आत्तापर्यंत महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर जनावरांचे कातडे पुरविण्यात येत होते. मुंबईतील एकट्या देवनार कत्तलखान्यातून प्रत्येक दिवशी तब्बल ४५० जनावरांचे कातडे या कारखान्यांना पुरविण्यात येत होते. यामध्ये प्रामुख्याने म्हशीच्या कातड्याचा समावेश होता. पूर्वी प्रत्येक कातड्यामागे या कारखानधारकांना १,५०० रूपये मोजावे लागत होते. मात्र, आता गोहत्याबंदीनंतर या कातड्यांचा पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कातड्यासाठी या कारखानदारांना कमीतकमी २,००० रूपये मोजावे लागत आहेत. येथून प्रक्रिया केलेले कच्चे चामडे पुन्हा धारावीसह अन्य बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येते. मात्र, आता या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
२०१२ पर्यंत ४५ रूपये प्रतिफुट मिळणाऱ्या चामड्याची किंमत येत्या काही दिवसांतच १०० रूपयांवर पोहचेल. त्यामुळे त्यापासून वस्तू तयार करून त्या कमीतकमी भावात ते विकणे, आता खूपच अवघड होणार असल्याचे शाहबाझ कुरेशी यांनी सांगितले. सध्या स्थानिक बाजारपेठेत कच्च्या चामड्याची किंमत ८० रूपये प्रतिफूट इतकी आहे. अगोदरच चीनमधून येणाऱ्या कृत्रिम चामड्यामुळे आमच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. आम्ही आत्तापर्यंत अस्सल चामड्याच्याच वस्तू विकत होतो. मात्र, आता बंदीमुळे आमच्यावर नकली उत्पादने ग्राहकांच्या माथी मारण्याची वेळ येणार असल्याचे येथील बांद्रा-लिंक रोडवरील एका दुकानदाराने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा