दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या गरजेप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, या भीतीने प्रशासनाने बियर उत्पादकांच्या पाणीपुरवठय़ावर बंधने आणली आहेत. साहजिकच, राज्यातील बियरचे उत्पादन चांगलेच घटले आहे. एप्रिल-मे या हंगामात, जेव्हा कडक उन्हाळ्याने अंगाची काहिली होत असते, तेव्हा शहरी भागातील बियरची मागणी आणि खपही प्रचंड वाढतो. त्या काळातच राज्यातील पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होईल हे गृहित धरून काही उत्पादकांनी मात्र अगोदरच बियरचे वाढीव उत्पादन करण्याची चलाखीही दाखविली आहे.
राज्यात औरंगाबाद जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर बियरचे उत्पादन होते. या परिसरात सहा मोठय़ा मद्यनिर्मिती कंपन्या आहेत. राज्यात दरवर्षी सरासरी १८ कोटी बल्क लिटर्सची विक्री होते. त्यातून राज्याला सुमारे २५०० कोटींचा महसूल प्राप्त होतो. विदेशी बनावटीच्या मद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने बियरच्या विक्रीत वाढ झाली. गेल्या वर्षांच्या तुलनेत बियरच्या विक्रीत १३ टक्के वाढ झाली आहे. यंदा मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे बियरच्या उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात येते.
औरंगाबाद परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा फटका बियर कंपन्यांना बसला. पुरेसे पाणी मिळत नसल्याने उत्पादन १० ते १५ टक्क्य़ांनी घटले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा सुमारे नऊ हजार कोटींचे महसुली उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बियरचे उत्पादन घटल्याने महुसलावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. आतापर्यंत सात हजार कोटी वसूल झाले असले तरी शेवटच्या दोन महिन्यांमध्ये उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दुष्काळामुळे बियर उत्पादन घटले!
दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या गरजेप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, या भीतीने प्रशासनाने बियर उत्पादकांच्या पाणीपुरवठय़ावर बंधने आणली आहेत.
First published on: 14-02-2013 at 04:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beer production reduced due to draudht