मुंबई : बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे या सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवारदरम्यान बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया अशा दोन फेऱ्या होणार आहेत. या सेवेमुळे मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ ६० मिनिटांत पार होणार आहे. यासाठी प्रवाशांना २५० आणि ३५० रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : उपनगरवासियांना पाण्यासाठी सायंकाळी ६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार
आधी हे दर ३०० आणि ४०० रुपये असे होते. मात्र आता प्रवासी भाड्यात ५० रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून मागील दोन माहिन्यांपासून बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून गेल्या आठवड्यात मुंबई बंदर प्राधिकरणाने यासाठी परवानगी दिली आहे. आता सोमवार, ६ फेब्रुवारीपासून या सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली.