ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता भेट देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र हिरवाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
तुटपुंजा पगार मिळत असल्याने हे आंदोलन करण्यात येत असून त्यातून ठाणेकरांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. पण, आंदोलनामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांची माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. तसेच या आंदोलनात फूट पडलेली नसल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
दरम्यान, घंटागाडी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकंदरीतच महापालिका प्रशासन आणि घंटागाडी कामगार हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अद्याप आंदोलनाचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यामुळे ठाणेकरांना आणखी काही दिवस कचरा समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
जेमतेम पाच ते सहा हजार रुपये पगार मिळत असून त्यातून घर खर्च, मुलांचे शिक्षण करणे शक्य होत नाही. त्यामुळे समान काम आणि समान वेतन या कायदेशीर मागणीसाठी आंदोलन सुरू केले. पण, आयुक्त भेट देत नसल्याने आंदोलनातूनही काहीच तोडगा निघू शकलेला नाही.
समान काम आणि समान वेतन या मागणीमध्ये तडजोड करण्यास तयार असून सफाई भत्त्यानुसार १० ते १२ हजार रुपये पगार मिळायला हवा पण, त्यासाठीही आयुक्त आता तयार नाहीत, असे हिरवाळे यांनी सांगितले. तसेच रिपाइं कामगार संघटनेचे नेते मनोज संसारे यांच्यासोबत आयुक्त गुप्ता चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुरूवारी ६० टक्के कामगार कामावर परतल्याने कामगारांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. असे असले तरी, आंदोलनात फुट पडलेली नसल्याचा दावा हिरवाळे यांनी या वेळी केला.
आयुक्तांची स्पष्टोक्ती
यासंदर्भात, आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी घंटागाडी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच ६० टक्के कामगारांपैकी १० ते २० टक्के कामगार आज कामावर आलेले नाहीत, उर्वरित कामगार कामावर आले होते अशी माहितीही त्यांनी दिली.
तीन दिवसांत घंटागाडी कामगार कामावर परतले नाहीत तर ठेकेदारामार्फत नव्या कामगारांची भरती करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा आयुक्त गुप्ता यांनी दिला होता. त्याची मुदत शनिवारी संपत आहे. असे असले तरी घंटागाडी कामगार आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आयुक्त गुप्ता यांनी ठेकेदारामार्फत नव्या कामगारांची भरती केल्यास आंदोलन करणाऱ्या सुमारे १३०० कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
तर कामगारांवर उपासमारीची वेळ..
ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता भेट देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र हिरवाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
First published on: 03-08-2013 at 07:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bell vehicle workers agitation still complex